आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाची कॉमेडी आणि कर्मचार्‍याची ट्रॅजेडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कागदपत्रे किंवा सॉफ्टवेअरमध्ये एखादी त्रुटी राहिली तर कर्मचार्‍याला कसा त्रास सहन करावा लागतो याचा प्रत्यय एका प्रामाणिक माणसाला आला आहे. केवळ कार्मिक चुकीमुळे 32 वर्षे शासनाची सेवा बजावणार्‍या आयटीआयमधील एका भांडारपालाचे तब्बल 8 महिन्यांचे वेतनच थकले आहे. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी केवळ बदलीचे कारण झाले. पदाच्या नावात बदलाचा फरक झाल्याची चूक शासनाचीच. त्याचा फटका मात्र या भांडारपालाला बसला. आपल्या कार्यालयापासून मुख्यालयापर्यंत सर्व पातळीवर उंबरठे झिजवले, पण काम झाले नाही. आता दिवाळी दूरच अख्ख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

दिवाकर चंद्रकांत नाईक असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. आतापर्यंतची त्यांची सेवा निष्कलंक राहिली. काम हीच पूजा अशा पद्धतीने काम केले, पण एका बदलीने त्यांचा पगारच थांबला. तसे पाहिल्यास ही छोटीशी, तांत्रिक चूक आहे, पण सरकार दरबारी सामान्यांचे सोडाच सरकारी नोकराचेदेखील ऐकले जात नाही. हेच यातून स्पष्ट होते.


असा झाला घोळ
शासनाचे वेतन सेवार्थ नावाच्या सॉफ्टवेअरमधून होतात. कर्मचार्‍यांचे सर्व रेकॉर्ड या सॉफ्टवेअरमध्ये ठेवले जाते. नाईक यांची मार्चमध्ये घनसावंगीत बदली झाल्यावर त्यांनी तिथल्या आयटीआय प्रशासनाला पगारपत्रक आणि अन्य कागदपत्रे दाखल केली. तिथल्या लिपिकाने तपासले असता सेवार्थमध्ये भांडारपाल हे पदच नव्हते. त्याऐवजी भांडारलिपिक असे पद नमूद आहे. हे पद नसल्यामुळे त्यांना वेतन अदा करण्यात अडचण निर्माण झाली.

डीबी स्टार तपास
नाईक यांच्या प्रश्‍नाबाबत डीबी स्टारने सखोल माहिती घेतली असता आयटीआयमधील भांडारपाल हे पदच बाद झाल्याचे समजले. त्याऐवजी भांडारलिपिक हे नवीन पद निर्माण झाले आहे. नाईक यांचे पद भांडारपाल आहे, पण शासनाच्या सेवार्थ सॉफ्टवेअरमध्ये हे पद नसल्याने त्यांची अडचण होत आहे.

बदली ठरली मारक
बदनापूरमध्ये मार्च ते जुलै असे 5 महिने त्यांनी डेप्युटेशनवर काम केले. या काळात त्यांची प्रत्यक्ष बदली घनसावंगीत होती. यामुळे त्यांचे वेतन घनसावंगी आयटीआयच्या अखत्यारीत आले. नाईक यांचे बदनापूरच्या आयटीआयमधील पद भांडारपाल असे होते. मात्र, घनसावंगी आयटीआयच्या रेकॉर्डमध्ये भांडारपालऐवजी भांडारलिपिक असे पद आहे. हे पदच त्यांना मारक ठरले.

तब्बल 8 महिन्यांचा पगार थकला
मार्च ते जुलै या काळात नाईक यांनी डेप्युटेशनवर बदनापुरात काम केले. नंतर ते घनसावंगीत रुजू झाले, पण या काळात त्यांना वेतन मिळालेले नाही. साफ्टवेअरमधील चुकीमुळे त्यांचे शासनाकडे 8 महिन्यांचे वेतन थकले आहे. बदनापूरमध्ये वापरल्या जाणार्‍या सेवार्थ साफ्टवेअरमध्ये भांडारपाल आणि भांडारलिपिक ही दोन्ही पदे आहेत. तेथे ही अडचण आली नाही, पण घनसावंगीत प्रशासनाच्या अज्ञानामुळे ही अडचण येत असल्याची नाईक यांची तक्रार आहे.

घरखर्चाचीही चिंता
माझी आतापर्यंतची सेवा निष्कलंकित राहिलेली आहे. काम हीच पूजा असे समजून मी सेवा बजावली, पण काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे माझे वेतन थकले आहे. ही लहानशी, तांत्रिक चूक आहे. आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. माझ्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. घरखर्च चालवणे कठीण होऊन बसले आहे.
-दिवाकर चंद्रकांत नाईक, भांडारपाल, आयटीआय, घनसावंगी

आम्ही प्रयत्न करतोय
नाईक यांच्या समस्येची आम्हाला पुरेपूर जाण आहे, पण त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. त्यांनी बदनापूरचा चार्ज उशिरा सोडला. शिवाय लास्ट पेड सर्टिफिकेट जमा करण्यातही त्यांनी 7 महिने उशीर केला. यामुळे पुढील कार्यवाही लांबली. मी स्वत: या प्रo्नात लक्ष घातले आहे. सहसंचालक कार्यालयालाही ही बाब कळवली आहे.
-एम. बी. कुलकर्णी, प्राचार्य, आयटीआय, घनसावंगी.

बदनापूर-घनसावंगी-बदनापूर आणि पुन्हा घनसावंगी
शासकीय सेवेत बदल्या आणि डेप्युटेशन हे प्रकार नवीन नाहीत. नाईक यांच्या नोकरीचा कार्यकाळ अशाच बदल्या आणि डेप्युटेशनने भरलेला होता.
> नाईक 32 वर्षांपासून आयटीआयमध्ये स्टोअरक ीपर म्हणजे भांडारपाल पदावर सेवा बजावत आहेत. 2001 ते 2013 दरम्यान ते बदनापूरच्या आयटीआयमध्ये होते.
> मे 2012 मध्ये त्यांची घनसावंगीच्या आयटीआयमध्ये बदली झाल्याची ऑर्डर निघाली. मात्र प्रत्यक्षात 1 मार्च 2013 रोजी त्यांना बदनापूरच्या आयटीआयने कार्यमुक्त केले. त्यांच्या जागी परभणीच्या आयटीआयहून जाधव नावाचे एक कर्मचारी रुजू झाले.
> जाधव बदनापूरला आले व लगेच निघून गेले. एकही दिवस येथे काम केले नाही. त्यामुळे घनसावंगीला बदली झाली असताना नाईक यांनी जुलै 2013 पर्यंत बदनापुरातच सेवा बजावली.
> जुलैमध्ये जाधव यांनी पदभार स्वीकारला. नंतर नाईक घनसावंगीला निघून गेले.