आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी थोपटली, खासदारांनी दाखवली पाठ! बकोरिया जात असतानाही खैरेंचा अबोला कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांनी बकोरियांची पाठ थोपटली. मात्र, त्याचवेळी खैरेंनी त्यांना पाठ दाखवली. - Divya Marathi
खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांनी बकोरियांची पाठ थोपटली. मात्र, त्याचवेळी खैरेंनी त्यांना पाठ दाखवली.
औरंगाबाद- समांतर योजनेचा करार रद्द करणारे ओमप्रकाश बकोरिया सोमवारी शहरातून जात असतानाही खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यातील अबोला कायमच राहिला. खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांनी बकोरियांची पाठ थोपटली. मात्र, त्याचवेळी खैरेंनी त्यांना पाठ दाखवली. 

दरम्यान, समांतर जलवाहिनी योजनेसाठी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत केलेला करार रद्द केल्यानेच महापालिका आयुक्तपदावरून ओमप्रकाश बकोरिया यांची बदली केली गेली, असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. येत्या दोन महिन्यांतच कंपनीला पुन्हा काम करू द्यावे, असा प्रस्ताव मनपा सभेसमोर येईल, असा दावाही शिरसाट यांनी केला. 

दरम्यान, महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासह बकोरिया यांनी जी चांगली कामे केली, ती सुरूच राहतील, असे नवनियुक्त मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी माध्यमांना सांगितले. बकोरिया यांच्या अनुपस्थितीत सोमवारी सायंकाळी वाजता त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. ज्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट्राचारावरून बकोरियांनी निलंबित केले त्याचा योग्य पाठपुरावा करून नियमाप्रमाणेच कार्यवाही करू. बीड बायपास रोडवरील मालमत्तांचे वर्गीकरण करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाडापाडी शक्य असल्याचे ते म्हणाले. 

तर समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा पालिकेकडे घेण्याचा निर्णय अवघड होता. किमान फारोळ्यापर्यंत मी पाणी आणू शकलो नाही, अशी खंत बकोरिया यांनी व्यक्त केली. 

समांतरमुळेच बकोरियांची बदली : शिरसाट 
वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय बकोरियांनी घेतला. त्याच वेळी त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यांनी करार रद्द करण्याच्या भानगडीत पडू नये, असाही दबाव उच्चस्तरावरून आणला जात होता, असे शिरसाट म्हणाले. 

बकोरियांनी समांतरची वाट लावली : खैरे 
बकोरियांनी समांतर जलवाहिनी योजनेची वाट लावली. त्याचे परिणाम डीएमआयसीला भोगावे लागतील, असा आरोप खैरे यांनी केला. सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी समांतरसाठी जिवाचे रान केले. १४६ कोटी रुपये केंद्राकडून आणले. पण बकोरियांनी त्यात खोडा घातला. आता ते सर्व पैसे परत जातील आणि समांतर योजना अडचणीत येईल, अशी चिन्हे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...