आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडींच्या ट्रॅव्हल्सचा अपघातात; २० जण गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज- नांदगाव तालुक्यातील आघारहून औरंगाबाद येथे लग्न सोहळ्यासाठी ४५ जण घेऊन येत असलेल्या वऱ्हाडींच्या ट्रॅव्हल्सचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले. आैरंगाबाद-मालेगाव मार्गावरील शिवगाव पाटी पुलावर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये ६ महिलांचा समावेश आहे.
  
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील आलवाडी येथील पंकज पाटील नामक वराच्या औरंगाबाद शहरातील वासंती लॉन्स येथे गुरुवारी (दि. १३) आयोजित  विवाह सोहळ्यासाठी ट्रॅव्हल्सने (एमएच ४१ बी ६७८६) नांदगाव तालुक्यातील आघार येथील ४५ वऱ्हाडी येत होते. दरम्यान, वैजापूर-औरंगाबाद-मालेगाव मार्गावर गारजपासून जवळच असलेल्या शिवगाव पाटी पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅव्हल्स जोराने आदळल्याने स्टिअरिंग रॉड तुटला. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उतरून २० फूट अंतरावरील खड्ड्यात जाऊन आदळल्याने एकच कल्लोळ झाला. 

या अपघातात २० वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक धनंजय फराटे, अशोक सोकटकर आदींनी दाखल होऊन जखमींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले, तर किरकोळ जखमींना  शिऊर बंगला येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक दीड तास ठप्प होती. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नवरदेवाचा मामेभाऊ उमेश लक्ष्मण सावंत यांच्या फिर्यादीवरून नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मालेगाव या कंपनीविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जखमी झालेले वऱ्हाडी...
भगवान सावंत, निवृत्ती सावंत, जिभाऊ सावंत, अनिल खैरनार, बाळकृष्ण देवरे, गुलाब सावंत, सुनंदा सावंत, मीराबाई खैरनार, मंगल आहेर, सिंधुबाई बच्छाव, कमलाबाई बच्छाव, लताबाई बच्छाव, देविदास साळुंके, सुरेश बच्छाव, कैलास सावंत, वाल्मीक पगार, सुरेखा सावंत, ज्ञानेश्वर देवरे (सर्व रा. आघार), चालक उमेश पाटील  हे २० जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...