औरंगाबाद- तंबाखू, गुटखा आणि सिगारेटच्या व्यसनामुळे दरवर्षी शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलनंतर कर्करोगावर उपचार करणारे शासकीय कर्करोग रुग्णालय राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. गेल्या तीन वर्षांत मुख कर्करोगाच्या ११,०१२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
तंबाखूच्या सेवनासोबतच महिलांमध्ये असलेल्या थायरॉइडमुळेही तोंडाच्या कर्करोगाचा सामना करावा लागत असल्याची उदाहरणे आहेत. शहरातील २५ ते ३० वयोगटांतील तरुणांना कर्करोग होण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे आजाराच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये रुग्ण उपचारांसाठी आल्यास ६० टक्के वाचण्याची शक्यता असते, तर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये १० टक्के रुग्णांना वाचवणे शक्य होते. मात्र, शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. प्रमोद धनसकर यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांमध्ये कर्करोग रुग्णालयात ३६६४ रुग्णांवर निदानासाठीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर ट्रॅकियोस्टॉमी ही जीव वाचवण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ६० रुग्णांवर करण्यात आली.
१६२ महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही मुख कर्करोग रुग्णांवर झाल्या आहेत. याशिवाय शहरातील खासगी रुग्णालयांचा आकडा यात भर घालणाराच आहे.
राज्यभरातून येतात रुग्ण
औरंगाबादेत असलेल्या रुग्णालयात नागपूर, पुणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथून रुग्ण उपचारांसाठी येतात. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा औरंगाबादेत उपचार घेणे ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक सोयीचे ठरते.
आयुष्यातील १० ते १५ वर्षे होतात कमी
तंबाखूच्या सेवनामुळे नैसर्गिक आयुर्मानातील १० ते १५ टक्के आयुष्य कमी होते. पक्षाघात, मुख कर्करोग, आंधळेपणा, अन्ननलिकेचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, पांढरे चट्टे, हिरडी विकार, दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि नपुंसकता यांचे प्रमाण वाढते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी काय करावे...