आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tree Collapse On Aurangabad Dhule Road Traffic Jam

वड उन्मळला; वाहतूक कोलमडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबई महामार्गावर शरणापूरच्या अलीकडे सुमारे शंभर वर्षांचा एक वटवृक्ष उन्मळून पडला आणि मुंबई, नाशिक, धुळे, सुरत, वैजापूर, वेरूळ, दौलताबादकडे जाणारी वाहतूक तीन तास ठप्प झाली. चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि हजारो लोकांचा औरंगाबादशी संपर्क तुटला. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर या महाकाय वटवृक्षावर कुर्‍हाडी चालवत तुकडे करून तो हटवण्यात आला आणि मग वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मुंबई महामार्गावर गुरुवारी (27 जून) सकाळी 10.30 वाजता वडाचे झाड उन्मळून पडले. या मार्गावरून जाताना एक एसटी आणि कारवर हे झाड कोसळणार होते, परंतु सुदैवाने हा अपघात टळला. मात्र, या घटनेने हा महामार्गच ठप्प झाला. आसपासच्या परिसरातून औरंगाबाद शहरात कामासाठी येणार्‍यांची वेळ असल्याने वाहनांची गर्दी या मार्गावर होती. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी, वैजापूर, मुंबई, नाशिक, सुरतकडे जाणारे ट्रक, मोटारी तसेच पावसाळी पर्यटनासाठी वेरूळ, दौलताबादला निघालेले पर्यटक यांची वाहने अडकून पडली. दोन्ही बाजूंनी चार किमींपर्यंत चारशेहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेजारील शेतातून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील चिखलात अनेक वाहने अडकून पडली. अनेक वाहनांनी शरणापूर-भांगसीमाता डोंगर-तिसगाव-एएस क्लबमार्गे सुमारे 20 किलोमीटरचा फेरा मारत औरंगाबाद गाठले.

झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. झाडाला रस्त्यातून हटवण्यासाठी एक क्रेन आणला होता. जकात नाक्यावरील पंधरा कर्मचार्‍यांनी झाडाला हटवण्यासाठी मदत केली. अडथळा दूर करेपर्यंत रस्त्यावरील वाहतूक मोकळय़ा जागेतून वळवण्यात आली होती. रस्त्यावर पडलेले झाड कटरच्या साहाय्याने कापून ते क्रेनने रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले. झाड कोसळल्याने मुंबई नाका ते दौलताबाद टी पॉइंट, तर दुसर्‍या बाजूला फौजी ढाब्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अडथळा दूर करण्यात आला.

वजन न पेलवल्याने वडाने प्राण सोडला
निसर्ग मित्रमंडळाचे दिलीप यार्दी म्हणाले की, वडाचा सगळा डोलारा केवळ त्याचा बुंधा आणि मुळय़ांवर सांभाळला जात नाही. पारंब्या ते काम करतात. या पारंब्याच वाढू दिल्या जात नसल्याने एका र्मयादेनंतर झाडाला वजन सहन होत नाही आणि ते जमिनीची साथ सोडून उन्मळून पडते. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विजय दिवाण म्हणाले की, रस्ता रुंदीकरणासाठी वाहतुकीत अडथळे येऊ नये यासाठी पारंब्या तोडल्या जातात. मग या झाडाचा आधारच नष्ट होतो. विनापारंबी वडाच्या झाडाचे वजन खूप असते. पाऊस पडला की वजन आणखी वाढते. मग या वडाचा आधारच नष्ट होतो. या झाडाच्या बाबतीतही तेच झाले.