आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपणासाठी आबालवृद्ध सरसावले; 8 हजार झाडांची लागवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून 8 जून रोजी शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना, तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना वृक्षारोपणासाठी एकत्र आणले. तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमने त्याआधी अनेक बैठका घेऊन नियोजन केले. त्यानंतर महिनाभरात या सर्व पर्यावरणप्रेमींनी 8 हजारांपेक्षाही जास्त झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्यावर जोर देण्यात आला आहे. नवीन जागा, सोसायट्यांमध्येही पुढे ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

दीपशिखा फाउंडेशनने लावली 265 झाडे
फाउंडेशनच्या मनीषा चौधरी यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी कमिटमेंट टू नेचर या उपक्रमाअंतर्गत तब्बल 300 झाडे लावली आहेत. तिरुपती शिक्षण संस्थेच्या 35 शाळांत जाऊन त्यांनी मुलांना रोपे दिली. तसेच त्या रोपांचे पालकत्वही त्या मुलांना दिले. वर्षभरात त्या त्या मुलांनी झाडे जोपासली पाहिजेत. चांगली जपवणूक करणार्‍या मुलांना शाबासकी म्हणून बक्षीसही देणार आहेत. त्यांनी या उपक्रमासाठी तिरुपती बालाजी औरंगाबाद संस्थेच्या बीड, अंबाजोगाई व औरंगाबादेतील 35 शाळांची निवड केली आहे.

गरवारे कम्युनिटी सेंटरचे 22 शाळांत अभियान
गरवारे कम्युनिटी सेंटरने सिडको आणि वाळूज परिसरातील शाळांमधे 250 झाडे लावली. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने आपल्या झाडाची नोंद ठेवण्याचा निश्चय केला आहे. दर तीन महिन्यांनी या झाडांचा आढावा घेतला जाणार असून चांगल्या झाडाला सेंटरतर्फे बक्षीस दिले जाणार आहे.

इंद्रप्रस्थ परिसरात हिरवाई
ग्रीन इंद्रप्रस्थ ग्रुपने इंद्रप्रस्थ कॉलनी व परसिरातील मंदिरांमध्ये एकूण 75 रोपे लावून सुरुवात केली आहे. यामध्ये दीपिका डावरे या तरुणीने पुढाकार घेऊन फोरमकडे विविध झाडांचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे ग्रुपच्या या कामात 8 शालेय विद्यार्थी व 2 तरुणींचा समावेश आहे.

औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम
विद्यापीठातील गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी 16 जून रोजी या फोरमने 1000 झाडे लावली. आणखी अडीच हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे. यासाठी सामाजिक वनीकरण व इतर विभागांतून रोपे मिळणार असल्याची माहिती फोरमचे श्याम शिंदे यांनी दिली. या अभियानात फोरमने शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. मुलेही अगदी आनंदाने वृक्ष लागवड करत आहेत.

ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम
वाळूज येथील ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून यंदा जून महिन्यात 7 हजार झाडांचे वाटप करण्यात आले. डीबी स्टारच्या अभियानांतर्गत मोफत झाडे देण्याचे काम या फोरमने केले. यात साई संस्था, विद्यापीठाला अडीच हजार झाडे, औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमला 1 हजार, जोगेश्वरी ग्रामपंचायतीला 2 हजार, विप्रो कंपनीला 750, इंडोटेक कंपनीला 225, सॅबमिलर कंपनीला 100, शहर व वाळूज परिसरातील शाळांना 250, शहर व वाळूज परिसरातील कॉलन्यांना 300 झाडे अशी एकूण 7 हजार झाडे वाटण्याचा विक्रम ग्लोबल डेव्हलपमेंटने केला आहे.

आस्थाचा सहभाग
आस्था फाउंडेशनचे सर्व ज्येष्ठ नागरिक वृक्ष लागवडीसाठी औरंगाबाद ग्रीन फोरमला मदत करणार आहेत. या ज्येष्ठांमध्ये वृक्षांवरील प्रेमाचा उत्साह शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे दिसून आला. फक्त हाक मारा, आम्ही येऊ, असे आश्वासन आस्था फाउंडेशनचे गिरीश हंचनाळ यांनी दिले आहे.

एनसीसी कॅडेट
विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसीचे प्राध्यापक लेफ्टनंट आर. बी. शेजूळ यांनी त्याचे 65 एनसीसी कॅडेट व देवगिरी महाविद्यालयाचे एनसीसीचे प्राध्यापक लेफ्टनंट प्रा. पी. टी. बाचेवाड यांनी त्यांचे 200 एनसीसी कॅडेट या वृक्षारोपणाच्या कामात मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. याबाबतच्या सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर कॅडेट्स महत्त्वाच्या कामात सहभागी होतील.

पथनाट्य
या बैठकीला पहिल्यांदाच शिवछत्रपती महाविद्यालयातील स्वदेश ग्रुपचे सदस्य आले होते. ही मंडळी वृक्ष लागवडीसाठी तसेच वृक्ष संर्वधनासाठी आगळेवेगळे पथनाट्य चौकाचौकात सादर करणार आहेत. तसेच ज्या मंडळींना यात सहभाग घायचा आहे त्यांनी या ग्रुपच्या अभिजित पाटीलशी संपर्क साधावा, जेणेकरून या ग्रुपची शक्ती वाढू शकेल.

मोफत जेसीबी
सातारा परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी तेथील खडकाळ जमिनीची मोठी समस्या होती; पण उद्योजक अमृत खादिया यांनी हा प्रश्न सोडवला. त्यांनी सातार्‍यातील खडकाळ जमिनीत खड्डे खोदण्यासाठी मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे मोठीच मदत होणार आहे. झाडे लावणे सोपे जाणार आहे.

निरगुडी, एरंड, शिकेकाई आणि चिल्लर
शहरात खूप नाले आहेत. या नाल्यांशेजारी निरगुडी, एरंड, जट्रोफा आदी झाडांच्या बिया टाकाव्यात. ही सगळी झाडे पटकन उगवतात आणि सहज फोफावतात. हिवाळ्यात व उन्हाळ्यात या झाडांना जिवंत राहण्यासाठी फक्त जमिनीचा ओलावा पुरेसा असतो. घराच्या कुंपणाला आपण तारेची किंवा सिमेंटची वॉल कंपाउंड टाकतो, पण त्याऐवजी जर सागर, शिकेकाई, चिल्लर लावली तर अगदी तीन महिन्यांत एक प्रकारची सुंदर हिरवी वॉल कंपाउंड तयार होते. यामुळे या दोन्ही बाबी करायला हरकत नाही. - कांतीलाल साकला

खड्डय़ांमध्ये गॅमा बेन्झीन टाका
रोपांची लागवड केल्यावर ती जगावीत म्हणून खड्डय़ांमध्ये कायम बावीस टीनचे सोल्युशन व गॅमा बेन्झीन पावडरचे मिर्शण तयार करून टाकावे. यामुळे खड्डय़ात जर बुरशी असेल तर ती नष्ट होते व झाडांची वाढ व्हायला मदत होते.दत्ता सावंत, औषधी वनस्पतींचे तज्ज्ञ

आम्ही करणार वृक्षारोपण
वाळूज महानगर येथील प्रभुसिंग गुजर हे गुणवंत कामगार आहेत. त्यांनी त्यांच्या कॉलनीत 60 घरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे, तर अविनाश कुलकर्णी हे ज्येष्ठ नागरिक व इतर सभासद शाकुंतलनगरात 20 झाडे लावणार आहेत. फोरममार्फत त्यांना झाडे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे औषधी वनस्पती शाळांमध्ये लावण्यासाठी दत्ता सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक शाळेत पाच झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. इच्छुक शाळांनी फोरमकडे नोंदणी करावी.