आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणासाठी झाडांची कत्तल; शेलगावात पीडब्ल्यूसी फाउंडेशन, सावित्रीबाई फुले मंडळाचा प्रताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावलेल्या शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. झाडे तोडून त्यांचा लाकूडफाटा रातोरात गायब करण्यात आला. जलसंधारणाच्या नावाखाली परवानगी घेता चांगल्या झाडांवर घाव घालण्यात आले. 

फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील गट क्रमांक ८० ही १५ हेक्टर ३६ आर गायरान जमीन सरकारच्या ताब्यात आहे. यावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत १९८६ मध्ये हजारो झाडे लावण्यात आली होती. मात्र, शेलगावात १९९५ च्या दरम्यान स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण होताच ही जमीन गावातील गायरान म्हणून ग्रामपंचायतीकडे सशर्त निगराणीसाठी वर्ग करण्यात आली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरी भागातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ठिकठिकाणी कामे करण्यात येत आहेत. 

याच धर्तीवर शेलगावात या जमिनीवर पीडब्ल्यूसी फाउंडेेशनच्या माध्यमातून जलसंधारण कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत या जागेवर वन विभागाने लावलेली शेकडो झाडे पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त करून रातोरात लाकूडफाट्याची विल्हेवाट लावण्यात आली. तोडलेली झाडे मोठी असून पोकलेनच्या साहाय्याने झाडे मुळापासून उखडून झाडांची निशाणी मिटवण्यात आली. 

तहसीलदारांनी केला पंचनामा 
हीअवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी फुलंब्री तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली होती. १८ एप्रिल २०१७ रोजी तहसीलदार संगीता चव्हाण यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी पंडित कदम यांनी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन स्थळपाहणी केली. झाडे तोडल्याचा अहवालही दिला. मात्र, अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. 

प्राण्यांच्या अस्तित्वारच घाला 
जलसंधारणाच्या माध्यमातून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम राबवली जाते. या चांगल्या मोहिमेला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, मुळात वन विभागाच्या जमिनीतील माती उकरायची असेल किंवा झाडे तोडायची असतील तर वन महसूल विभागाची परवानगी लागते. ती कुणीही घेतलेली नाही. विशेष म्हणजे या वनात कोल्हे, लांडगे, मोर, हरीण, तरस आणि माकडांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या भागात झाडांची संख्या जास्त असणे केव्हाही चांगले. शिवाय पोकलेनच्या आवाजाने प्राणी भयभीत झाले आहेत. झाडे तोडताना उकरलेली माती मर्जीतील शेतकऱ्यांच्या वावरात टाकण्यात आली. यातूनच त्यांचा उद्देश लक्षात येतो. याउलट ही माती उकरून झाडांना लावली असती तर पाणी थांबले असते.
- तक्रारदार

आम्ही एकहीझाड तोडले नाही. बंधारा करताना आड येणारी झुडपे केवळ तोडून साफसफाई केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनी पंचनामा केल्याचे आम्हाला समजले आहे; पण झाड तोडण्याच्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही.
- गोपीचंद ठाकरे, अभियंता, सावित्रीबाई फुले महिला मंडळ 

माती नाल्याच्या बांधाला गळती लागली होती. ती दुरुस्त करण्यासाठी झाडे तोडली. बांधाखाली असलेल्या झाडांमुळे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी काही झाडे काढून घेतली. मी नव्यानेच सरपंच झालो आहे. परवानगीबाबत माहीत नव्हते.
- साहेबराव इधाटे, सरपंच

आम्ही रीतसरपंचनामा केला आहे. तहसीलदारांकडे तसा अहवाल दिला आहे. ६० ते ७० लहान-मोठी झाडे विनापरवाना तोडली आहेत. संस्थेचे काम विधायक आहे. मात्र, त्यांनी झाडे चुकीने तोडली. नियमाप्रमाणे वनविभागाच्या अखत्यारीतील जागेवर पोकलेन अथवा जेसीबी वापरता येत नाही.
- पी.आर. कदम, मंडळअधिकारी 

ते कामसावित्रीबाई फुले मंडळ आणि पीडब्ल्यूसी फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे. आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घेताना केवळ मातीनाला बांध तयार करावा. जंगलातील झाडे तोडू नका, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. याप्रकरणी तहसीलदारांमार्फत चौकशी सुरू आहे.
- एस.एस. काळे, ग्रामविकासअधिकारी
बातम्या आणखी आहेत...