आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी कार्यालय असो की खासगी संस्था सगळ्यांनीच पर्यावरणाचा र्हास घडवून आणण्याचा जणू विडाच उचलल्याचे दिसते आहे. कुठलीही परवानगी न घेता झाडांवर घाव घातले जात आहेत. या वेळी दोन सरकारी कार्यालयातच हा प्रकार घडला आहे. एका ठिकाणी दुर्मिळ झालेल्या लिंबाच्या झाडांची कत्तल करण्यात आली तर दुसर्या एका कार्यालयात एक झाड इंधनासाठी तोडण्यात आले. डीबी स्टार चमूमुळे अन्य पाच झाडे मात्र वाचली.
सिपेटमध्ये लिंबाच्या झाडांवर कटर
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक पी 81 वर सिपेट म्हणजेच केंद्रीय रसायन मंत्रालयाची जागा आहे. याच जागेवर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी विनापरवानगी लिंबाची अनेक झाडे तोडण्यात आली. लाकूडतोड्यांनी वाहनांमध्ये लाकडे भरून ती पळवली. या वेळी प्रतिनिधीला धक्काबुक्की करून धमकावण्यात आले.
महाराष्ट्र वृक्षजतन अधिनियम 1975, नागरी क्षेत्र प्रकरण 8 च्या कलम 21 नुसार वृक्ष तोडण्यास परवानगी आवश्यक आहे. बांधकाम करताना विद्युत तारांना अडथळा येत असेल वा जीवित हानीचा धोका असेल तर वृक्ष प्राधिकरण अधिकारी अथवा सदस्यांकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. मगच झाड तोडता येते. या प्रकरणात अशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले.
पोलिसांनी माहिती दिली
मी या वसतिगृहाचा ठेका घेतला आहे, मात्र त्यावरील झाडे कुणी तोडली हे मला माहिती नाही. मी आज स्वत: एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबतची सर्व माहिती कळवली आहे. यात माझा काहीही दोष नाही.
-आनंद घोडेले, संचालक, ऋषिकेश कन्स्ट्रक्शन
आम्ही झाडे तोडलीच नाहीत
आम्ही झाडे तोडलीच नाहीत. झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रयत्न चालू आहेत. हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. आम्ही या कामाचा ठेका ऋषिकेश कन्स्ट्रक्शनला दिलेला आहे. आपण त्यांच्याशीही संपर्क करावा.
- वैभव रगडे, लेखा अधिकारी, सिपेट
आमचा काय संबंध
झाडे तोडण्यासाठी या कंपनीने आमच्याकडे अर्ज सादर करण्याचा प्रo्नच येत नाही. यासंबंधी कुठलिही परवानगी आम्ही देत नाही. या लोकांनी काही कामानिमित्त आमचाकडे अर्ज सादर केलेला आहे. त्याच्याही त्रुटींची पूर्तता केली नसल्याने त्यांची बांधकाम परवागनी थांबवलेली आहे.
-संजीव रेदासनी, फिल्ड ऑफिसर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
फौजदारी गुन्हा दाखल करणार
सिपेट टेक्नालॉजीने वृक्षतोडीबाबत कुठलाही अर्ज आमच्या वृक्ष पर्यावरण संवर्धन विभागाकडे सादर केलेला नाही. या विभागाला आम्ही वृक्षतोडीबाबत कुठलिही परवानगी दिलेली नाही. सुटीचा दिवस पाहून या लाकूडतोड्यांनी हे कृ त्य केलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेवून तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार.
-विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा
इंधनासाठी तोडले झाड
जुने आणि वाळलेले झाड आहे, असे कारण पुढे करत गारखेडा परिसरातील उपविभागीय अभियंता पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्रमांक 8 या सरकारी कार्यालयात एका झाडावर घाव घालण्यात आले. अन्य पाच झाडेही तोडली जाणार होती; परंतु चमू घटनास्थळी पोहोचताच या झाडांभोवती आवळलेला दोरांचा फास सोडून लाकूडतोड्यांनी पलायन केले.
गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौक मार्गावरील या कार्यालयाच्या मागच्या बाजूला काही झाडांवर घाव घातले जात असल्याचे काही जागरूक नागरिकांनी कळवले. तत्काळ चमूने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत एक झाड तोडले होते. मात्र, इतर पाच झाडे वाचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.