आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांच्या मनामध्‍ये बीजारोपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्टार ग्रीन औरंगाबाद फोरममध्ये सहभागी निसर्ग मित्रमंडळ, औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम, ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम, गरवारे कम्युनिटी सेंटर, दीपशिखा फाउंडेशन, ग्रीन थिंकर्स, त्रिमूर्ती शाळा, चाटे स्कूल यांच्या सहकार्याने शहरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम जोरात सुरू आहे. याशिवाय सोसायट्या आणि खासगी स्तरावर लोकांनी फोरमच्या मदतीने झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला.


असे झाले वृक्षारोपण
औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम: विद्यापीठ परिसरात टेकड्यांवरील पाणी साठवण्यासाठी यंत्रणा उभी केल्यानंतर औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमने दुस-या टप्प्यामध्ये 4 हजार झाडे लावली. पहिल्या टप्प्यातील 1 हजार मिळून 5 हजार झाडांचा टप्पा गाठला आहे. विषेश म्हणजे सर्वच झाडे वाढत आहेत. मात्र गुरांपासून झाडांना धोका आहे. विद्यापीठाने याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी फोरमचे श्याम शिंदे आणि भगतसिंग दरख यांनी केली आहे.


‘दीपशिखा’मुळे 2,747 विद्यार्थी वृक्षमित्र: दीपशिखा फाउंडेशनच्या कमिटमेंट टू नेचर या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थीरूपी रोपट्यांना 2,747 रोपट्यांची भेट देण्यात आली. शिशुविहार शाळेत 700, शारदा मंदिरात 685, जागृती हायस्कूलमध्ये 500, गुरू तेगबहादूर शाळेत 150, महात्मा फुले विद्यालयात 350, मराठा हायस्कूलमध्ये 190 तर श्रेयस माध्यमिक शाळेत 75 झाडे लावण्यात आणि वितरण करण्यात आली.


‘त्रिमूर्ती’च्या विद्यार्थ्यांची रोपांशी गट्टी: त्रिमूर्ती बालक मंदिर आणि शिक्षण संस्थेच्या बजाजनगरमधील शाळेत 1 हजार विद्यार्थी आणि पालकांना रोपांची भेट देण्यात आली. यासाठी एक कार्यक्रम आयोजित करून मुलांना झाडांचे महत्त्व आणि वृक्षारोपणाची पद्धत सांगण्यात आली. संस्थेच्या संस्थापिका पुष्पा दीक्षित, नितीन दीक्षित यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका रंजना घोडके आणि शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेतले. यासोबतच शाळा परिसरात 50 झाडे लावण्याबरोबरच ग्रीन स्काय क्लबची स्थापना करण्यात आली.


गरवारे कम्युनिटी सेंटर: डीबी स्टार फोरमच्या माध्यमातून शाळा, सोसायट्या आणि सामाजिक संस्थांना देखील वृक्षांचे वितरण करण्यात आले. गरवारे कम्युनिटी सेंटरने यासाठी आपली यंत्रणा कामाला
लावून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दुस-या टप्प्यात दीड हजार रोपांचे वितरण केले.
स्टेट बँक लर्निंग सेंटर: स्टेट बॅक लर्निंग सेंटरने सहायक प्रबंधक श्याम जैन यांच्या अध्यक्षतेखाली परिसरात 208 झाडे लावली. या सेंटरच्या कर्मचा-यांवर या झाडांच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भक्ती गणेश मंदिर: भक्ती गणेश मंदिर ट्रस्टने परिसरात 20 झाडे लावली. यात गुलमोहर, जास्वंद, बेल आदी झाडांचा समावेश आहे.


आम्ही करणार वृक्षारोपण: स्टेट बॅक लर्निंग सेंटर परिसरात आणखी 1 हजार झाडे लावणार आहे. सेंटरचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देशपांडे यांनी ही माहिती दिली.श्री गणेश सभा खुलताबाद येथील कानोबा मठात 100 झाडे लावणार आहेत. सभेचे अध्यक्ष प्रकाश राशीनकर यांनी ही माहिती दिली. यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या ठिकाणी ट्री गार्डही लावले जाणार आहेत, तर अभिजित चव्हाण या विद्यार्थ्याने त्याच्या घरातील शेवग्याच्या झाडांची रोपे तयार केली आहेत. पावसाळ्यात झाडाखाली बिया पडल्यास त्याचे रोपटे तयार होते. अभिजितने अशा प्रकारे 20 रोपे तयार केली आहेत. अभिजित या रोपट्यांचे मोफत वितरण करणार आहे.


यांनी केली मदत : उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामाजिक वनीकरण विभाग, निसर्ग नर्सरीचे सुधीर थोरात,
ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम


कामगारांनी लावली 62 झाडे
ग्रीन औरंगाबाद फोरमच्या दुस-या बैठकीत संकल्प केल्याप्रमाणे गुणवंत कामगार प्रभूसिंग गुर्जर यांनी पुढाकार घेऊन वाळूज महानगरात 62 झाडे लावली. पोलिसांची वसाहत असणा-या सुधाकरनगरात झाडांची संख्या वाढावी यासाठी या भागात 130 रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी या भागातील युवक आणि महिलांनी पुढाकार घेतला. फोरमच्या सदस्यांनी वसाहतीची पाहणी करून झाडे दिली.


चलो ‘साई’...
रविवार सकाळी 8 वाजता
आपण आपला दिवस सार्थकी लावू इच्छिता. निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवून पर्यावरणाला हातभार लावायचा आहे...उत्तर होय असेल तर रविवारी सकाळी 8 वाजता विद्यापीठ परिसरातील भारतीय खेल प्राधिकरण येथे वृक्षारोपण महाअभियानात सहभागी होण्यासाठी या.. डीबी स्टार ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम आणि साईच्या वतीने तब्बल 8 हजार झाडांचे एकाच दिवशी वृक्षारोपण केले जाणार आहे. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डीबी स्टार, डॉ. दिलीप यार्दी, सुनील सुतवणे, मनीषा चौधरी, चाटे स्कूलचे संदीप राजहंस, त्रिमूर्ती शाळेचे नितीन दीक्षित यांनी केले आहे.


महाअभियानात सहभागी व्हा
विद्यापीठातील वृक्षारोपणानंतर आता ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’ परिसरात महाअभियान राबवत आहोत. रविवारी सकाळी 8 वाजता मोहीम सुरू होईल. पुढेही ती सुरू राहील.
संदीप नागोरी, औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम


भकास ते झकास
मी येथे येण्यापूर्वी ही संस्था भकास होती. आता सर्वत्र हिरवळ पसरली आहे. पुढे आता झकास करायची आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाऊ शकते. त्यामुळे फोरमच्या या मोठ्या मोहिमेत सहभागी झालो आहे.
व्ही. भांडारकर, सहायक संचालक, भारतीय क्रीडा प्राधिकरण