आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पुन्हा रुजतोय संयुक्त कुटुंबाचा ट्रेंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आई, वडील आणि मुलगा अशा त्रिकोणी कुटुंबांचे चित्र देशाच्या शहरी भागात आता बदलतेय. आई-वडिलांसोबतच आजी, आजोबा, काका , काकू आणि आणि त्यांची मुले कुटुंबांतील सदस्य होत आहेत. गेल्या 10 वर्षांत दोन-तीन जोडपे असणार्‍या संयुक्त कुटुंबांची क्रेझ वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे खर्च विभागण्यासाठी तसेच मुलांची सुरक्षितता आणि त्यांना संस्कारक्षम बनवणे ही हा ट्रेंड पुन्हा रुजण्याची कारणे आहेत.
2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन ए. सी. निल्सने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. भाऊ-भाऊ, जावा-जावा, नणंद-भावजया आणि आजी-आजोबा हे पूर्वी कुटुंबात एकत्र नांदायचे. एकत्र राहिल्याने नाते दृढ व्हायचे. एकीच्या बळामुळे घर किंवा घरातील सदस्यांवर बाहेरील व्यक्तीची वाईट नजर पडत नसे. मात्र, पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात संयुक्त कुटुंबे तुटली. शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विभक्त कुटुंबे तयार झाली. मात्र, गेल्या 10 वर्षांत दूर गेलेले घरातील सदस्य पुन्हा एकदा एका छताखाली नांदायला परतले आहेत. 2001 च्या जनगणनेच्या तुलनेत संयुक्त कुटुंबांची संख्या वाढली आहे. हा फरक फार मोठा नसला तरी एक चांगली सुरुवात म्हणून याकडे पाहायला हवे.
काय सांगतात आकडे - देशात 2001 मध्ये 70.3 टक्के कुटुंबांत किमान एक विवाहित जोडपे होते. 2011 मध्ये यात थोडी घसरण होऊन ती 70.2 टक्क्यांवर आली. किमान दोन जोडपी असणार्‍या 13.5 टक्के कुटुंबांची संख्या 14.1 टक्क्यांवर गेली, तर 3 जोडपी असणार्‍या कुटुंबांत 2.7 टक्क्यांवरून 2.9 टक्के वाढ झाली आहे. 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये एकूण संयुक्त कुटुंबीयांची संख्या 14.5 टक्क्यांवरून 16.3 टक्क्यांवर गेली आहे. महाराष्ट्रात 2001 च्या 14.8 टक्क्यांवरून ही संख्या 17.6 टक्क्यांवर गेली आहे. 2001 मध्ये एक जोडप्यांची 73.2 टक्के होती. ती 2011 मध्ये 69.1 टक्क्यांवर घसरली. दोन जोडपी असलेल्या कुटुंबांची संख्या 11.4 वरून 14 टक्क्यांवर, तीन जोडप्यांच्या कुटुंबांची संख्याही 2.6 वरून 3 टक्क्यांवर, तर चार जोडपी असणार्‍या घरांची संख्याही 0.6 वरून 0.7 टक्क्यांवर गेली आहे. टक्केवारीत हा फरक क्षुल्लक वाटत असला तरी 125 कोटींच्या लोकसंख्येत ही आकडेवारी दखल घेण्याजोगी आहे.
अशी मोजली कुटुंबे- एकापेक्षा जास्त विवाहित जोडपी असणार्‍या कुटुंबांना संयुक्त कुटुंब म्हटले जाते. जनगणनेत घरनोंदणीच्या वेळी कुटुंबातील सदस्यांसोबतच कुटुंबात एकत्र राहणार्‍या विवाहित जोडप्यांची संख्या नोंदवली गेली. यावरून एका घरात किती जोडपी राहत आहेत याची आकडेवारी मिळाली. त्यातुन संयुक्त कुटुंबांची संख्या समजली.
एकही जोडपे नसणारे वाढले- महाराष्ट्रात तब्बल 13.3 टक्के कुटुंबांत एकही विवाहित जोडपे नाही. 2001 मध्ये अशा कुटुंबांची संख्या 12 टक्के होती. अशा कुटुंबांत एकटा पती, पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, विधवा, विधूर यांचा समावेश असतो. महाराष्ट्रात कामानिमित्त मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होते. यामुळे हे लोक एकटे राहतात, असे हे सर्वेक्षण सांगते.
आर्थिक, सुरक्षिततता महत्त्वाची- शहरी भागात नोकरीनिमित्त बाहेर पडल्यानंतर मुख्य प्रश्न राहण्याचा येतो. दोन भाऊ वेगळे राहिले तर दोन ठिकाणी घरभाड्यात व घरात पैसा लावावा लागतो. याउलट एकत्र राहिले तर हा पैसा वाचतो. नव्या पिढीला संस्कार आणि सुरक्षितता मिळण्याच्या दृष्टीनेही एकत्र कुटुंबांना पर्याय नसल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
विवाहित जोडपे 2001 2011
महाराष्ट्र देश महाराष्ट्र देश
एकही नाही 12.0 11.1 13.3 11.6
एक जोडपे 73.2 70.3 69.1 70.2
दोन जोडपी 11.4 13.5 14.0 14.1
तीन जोडपी 2.6 3.6 3.0 3.2