आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribute For Poet Namdeo Dhasal Issue At Aurangabad

शिवीला ओवीचे रूप देणारा नामदेव, विचारवंत ज. वि. पवार यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठी साहित्यात त्याज्य असलेले शब्द कवितेत वापरून मैलाचा दगड नामदेव ढसाळ यांनी रोवला. विद्रोही साहित्यात त्यांनी नवीन पाऊलवाट निर्माण केली. बिनधास्तपणे सामान्य माणसांच्या समस्या आपल्या लेखणीतून मांडणार्‍या ढसाळांनी शिव्यांनाही ओवीचे रूप दिले. ते साहित्यरूपात कायम आमच्यात राहतील, असे मत ज्येष्ठ कवी, विचारवंत ज. वि. पवार यांनी व्यक्त केले. पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ढसाळ यांना रविवारी तापडिया नाट्यमंदिरात श्रद्धांजली वाहण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.

माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्राचार्य राजाराम राठोड, डॉ. सिद्धांत गाडे, मुकुंद सोनवणे, पंडित नवगिरे, किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, कविता हेच नामदेव यांचे अस्त्र आणि शस्त्र होते. अगदी सामान्य घरात जन्मलेल्या या तरुणाने राजकारणात आणि साहित्यात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. गोलपिठा, गांडू बगीचा, खेळ, या सत्तेत जीव रमत नाही हे ढसाळांचे कवितासंग्रह जागतिक साहित्यातील माइलस्टोन ठरले. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी दलितांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडली. पँथरचा झंझावात म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते नामदेव ढसाळ कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या साहित्यातून कायम राहतील.

या वेळी अमोल पाणबुडे यांनी नाट्यरूपांतर केलेले आणि चरण जाधव दिग्दर्शित ‘गांडू बगिचा’ या एकांकिकेचे सादरीकरण केले. श्वेता मांडे, चरण जाधव, रावबा गजमल, संजय मघाडे, आशिष झाडके, रूपेश परतवाघ, सुनील सौंदरमल यांनी या एकांकिकेत भूमिका साकारल्या. शहीद भगतसिंग कला पथकाने क्रांतिकारी गीते सादर केली. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.