आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधक रा.चिं. ढेरे, कवी तुलसी परब यांना साहित्यिकांची भावपूर्ण श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राचिन साहित्य आणि संस्कृतीचे संशोधक डॉ. रामचंद्र ढेरे आणि मराठी कवितेला राजकीय, सामाजिक जाणिवेचे परिमाण देणारे कवी तुलसी परब यांच्या निधनाने मराठी साहित्याची अपरिमित हानी झाल्याचे मत गुरुवारी शहरातील मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात डॉ. रा. चिं. ढेरे तुलसी परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले, तुलसी परब यांना पहिल्यापासूनच प्रकृतीने साथ दिली नाही. कलंदर व्यक्तिमत्त्वाच्या तुलसी यांचे वाचन अफाट होते. त्यांनी साम्यवाद आंधळेपणाने स्वीकारला नाही. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. अत्यंत चिंतनशील कविता लिहित त्यांनी जन्म-मृत्यूचे संदर्भ उलगडले हे सांगताना पाटील यांनी परब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
रा. चिं. ढेरे यांच्याविषयी मत मांडतांना डॉ. सतीश बडवे म्हणाले, ते कष्टातून वर आले होते. पायाळू संशोधक ही त्यांची ओळख होती. कुठल्याही वादात अडकता त्यांनी आपले कार्य केले. संशोधनाला ठोस पुरावा त्यांनी दिला. अभिजन बहुजन यांची संस्कृती जोडण्याचे कार्य त्यांनी केले. शहरातील विद्यापीठाच्या ग्रंथालयातील जनरलमधील कानोले यांचा लेख त्यांना हवा होता. परंतु तो देण्यापूर्वीच ते गेले याची खंत वाटते. भारतीय पातळीवरून संतसाहित्याचा विचार व्हावा, संशोधन व्हावे अशी ढेरे यांची दूरदृष्टी होती.
एक व्रतस्थ संशोधक मराठी साहित्यातून हरपला आहे, अशी भावना बडवे यांनी व्यक्त केली. या वेळी मसापचे कार्यवाह दादा गोरे यांनी शोकसंदेशाचे वाचन केले. या वेळी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...