आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किशनचंद तनवाणी यांच्या श्रीमुखात भडकावण्याचा प्रयत्न; काचीवाडा येथे घडला प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या श्रीमुखात भडकावण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास चेलीपुऱ्यातील काचीवाडा येथे भाजपतर्फे नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आणि शहीद दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. 


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोहळा सुरू होण्यापूर्वी किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये व्यासपीठाच्या खाली खुर्चीवर बसून गप्पा मारत असताना याच भागात राहणारा पस्तीस वर्षांचा तरुण तिलक भुरीवाले तेथे आला आणि तनवाणी यांना म्हणाला, मुझे पहचानते क्या. त्यावर तनवाणी नाही म्हणताच त्याने त्यांच्या श्रीमुखात भडकावण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. तेवढ्यात मकरिये, सावे यांनी त्याला पकडले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी तिलकला मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर प्रवेश सोहळा पार पाडला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याची नोंद नव्हती. 


गुलमंडीत टपरी टाकण्यावरून झाला होता वाद
चार महिन्यांपूर्वी गुलमंडी येथे मेवाड हॉटेलजवळ टपरी टाकण्यावरून तिलकचा वाद सुरू झाला होता. तेव्हा तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी यांनी त्यास विरोध केला. तेव्हा दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्याच कारणावरून रविवारी प्रवेश सोहळ्यात हा प्रकार झाला. 


स्थानिकांच्या भाजप प्रवेशाचे कारण 
काचीवाडाहाभाग शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो. तेथील स्थानिक भाजपात प्रवेश करत असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. हा तरुण माझ्याकडे बोलण्यासाठी आला होता. अचानक त्याने अंगावर येण्याचा प्रयत्न केला, मात्र इतरांनी त्याला रोखले. 
-किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष 

बातम्या आणखी आहेत...