आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांची निवड: आधी शेरवानी घातलेले शेर आले, त्यानंतर फेटेधारी वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरपदी त्र्यंबक तुपे व उपमहापौरपदी प्रमोद राठोड यांची निवड झाल्यानंतर मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्यांच्याकडे राजदंड सुपूर्द केला.छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद - मतदानासाठी पक्ष, गटाने नगरसेवक सकाळी पालिका मुख्यालयात दाखल झाले तेव्हा हा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. सर्वात आधी एमआयएमचे नगरसेवक ‘कोण आया, शेर आया’ अशा घोषणा देत दाखल झाले. या पक्षाच्या पुरुष नगरसेवकांनी शेरवानी परिधान केली होती. त्यांनी जवळजवळ दहा मिनिटे घोषणा दिल्या. त्यानंतर युतीचे नगरसेवक डेरेदार फेटे परिधान करून दाखल झाले. नेहमीच्या घोषणांबरोबरच त्यांनी ‘शिवसेनेचे वाघ आले’ अशी घोषणाबाजी केली. या घोषणांनी पुन्हा एकदा परिसर दणाणून गेला होता.

सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी एमआयएमचे नगरसेवक मुख्यालयात दाखल झाले तेव्हा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल प्रवेशद्वाराजवळच थांबलेले होते. त्यांनी नगरसेवकांचे अभिनंदन केले. बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला आधी भाजप व नंतर सेनेचे नगरसेवक दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक आले. तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. सर्वात शेवटी राष्ट्रवादीचे नगरसेवक दाखल झाले.

राजू शिंदे फेट्याविनाच
युतीचे अधिकृत तसेच समर्थक असे सर्व ७१ नगरसेवक फेटे बांधून आले होते. महिलांनीही फेटे बांधले होते. काही भगवे, तर काही निळे फेटे उठून दिसत होते. मात्र, यात भाजपचे राजू शिंदे यांनी मात्र डोक्यावर फेटा घेतला नाही. भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते; परंतु नंतर माघार घेण्यास सांगितल्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी फेटा बांधला नसल्याची चर्चा होती.

ओळखपत्र नसल्याने कांबळे खोळंबल्या
नगरसेवक झाल्यानंतर नक्षत्रवाडी-कांचनवाडीच्या नगरसेविका विमल कांबळे मतदानासाठी दाखल झाल्या. त्या पहिल्यांदाच पालिकेत प्रवेश करत होत्या. मतदानाच्या वेळी एक ओळखपत्र आवश्यक असते याची त्यांना माहिती नव्हती. त्यांच्याकडे एकही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर थांबावे लागले. त्यानंतर नातेवाइकांनी नक्षत्रवाडीहून ओळखपत्र आणले. तोपर्यंत अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. परंतु ओळखपत्र आल्यानंतरच त्या मत नोंदवू शकल्या.

प्रवेश देण्यावरून वादावादी
मतदान प्रक्रियेदरम्यान पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, पत्रकार वगळता कोणालाही प्रवेश निषिद्ध होता, तरीही अनेकांनी प्रवेश मिळावा यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. मावळत्या महापौर कला ओझा, मावळते उपमहापौर संजय जोशी यांनाही काही मिनिटे प्रवेशद्वारावर थांबावे लागले. मावळते नगरसेवक अनिल मकरिये यांची तर पोलिसांशी बाचाबाची झाली. काही मिनिटे वाद घातल्यानंतर अखेर त्यांनी प्रवेश मिळवलाच.

पालकमंत्र्यांच्या गाडीलाही प्रवेश नाही
पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या लाल दिव्याच्या मोटारीलाही पालिका मुख्यालयाच्या आवारात प्रवेश दिला नाही. ते सामान्यांप्रमाणेच छोट्या गेटमधून आत आले. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर रिकामी मोटार नंतर आत पाठवण्यात आली. सकाळी मावळत्या महापौर कला ओझा यांची मोटारही पोलिसांनी आत येऊ दिली नाही.
पाहा, निवडीनंतरच्या जल्लोषाची काही क्षणचित्रे