आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा घाटात दोन ट्रक धडकले; 7 तास वाहतूक ठप्‍प, 20 किमीपर्यंत वाहनांच्‍या रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  शुक्रवारी रात्री अजिंठा घाटात नादुरुस्त ट्रकवर समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्‍यामुळे रात्री घाटात 7 तास वाहतूक ठप्‍प झाली होती. घाटात सुमारे वीस किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानि झाली नाही. मात्र गुजरात पासिंगच्या ट्रकवरील चालक व क्लिनर यांच्‍या हातापायाला दुखापत झाली.
 
सकाळी अकरा वाजता दोन्‍ही ट्रक क्रेनच्‍या साहाय्याने रस्‍त्‍यावरुन हटवण्‍यात आले. त्‍यानंतर रस्‍त्‍याच्‍या केवळ एका बाजुने वाहतुक सुरु करण्‍यात आली. त्‍यामुळे पूर्ण वाहतूक सुरळीत होण्‍यासाठी घाटातील प्रवाशांना दुपारी दोन वाजेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. 
 
अजिंठा घाटात घोडी पटांगणाच्या वर मक्याची वाहतूक करणारा ट्रक (MH-28 B 8055) शुक्रवारी रात्री पासून नादुरुस्त उभा होता. त्‍यादरम्‍यान औरंगाबादहुन जळगावकडे चिंच घेऊन जाणाऱ्या ट्रकने (GJ-19 U 3452) नादुरुस्‍त ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. यात गुजरात पासिंगच्या ट्रकवर असलेले रवी भाई (वय 45) आणि प्रताप अर्जुन (वय 35) यांच्‍या हातापायाला गंभीर दुखापत झाली. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दोघांवरही प्राथमिक उपचार करण्‍यात आले. त्‍यानंतर उपचारासाठी त्‍यांना औरंगाबादकडे पाठविण्यात आले. 

यादरम्‍यान अजिंठा घाटातील वाहतूक व्यवस्था सपोनि मनोहर वानखेडे, फोजदार अर्जुन चोधर, अनंत जोशी, अजय मोतींगे, दत्तात्रय मोरे, अजित शेकडे, रवी भरती, रवी बोर्डे यांनी सांभाळली. तर फरदापुरातील पोलिसांनीही वाहतूक सुरळीत व्‍हावी म्‍हणून मदत केली. 

सात तास वाहतूक ठप्‍प झाल्‍याने वाहनचालकांचे हाल 
यावेळी अजिंठा गावातून एक वऱ्हाड लग्नासाठी खानदेशला चालले होते. मात्र घाटातील अपघातामुळे त्‍यांना अनेक तास ताटकळावे लागले. 

या युवकाने 40 पर्यटकांना काढले बाहेर 
यावेळी घाटात अडकलेल्‍या पर्यटकांच्‍या मदतीसाठी पुढे येत अजिंठा येथील शेख फईम युवकाने चांगल्‍या वर्तवणुकीचे दर्शन घडविले. शेख फईम यांनी आपल्‍या बाईकद्वारे घाटात अडकलेल्‍या किमान 40 देशी-विदेशी पर्यटकांना अजिंठा ते फर्दापूरपर्यंत नेऊन सोडले. याबद्दल सर्व पर्यटकांनी शेख फईम यांच्‍याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त केली.    
 
द्राक्ष आणि पाण्‍याच्‍या बॉट्ल्‍सची दुप्‍प्‍ट भावाने विक्री 
घाटात सात तास वाहतूक ठप्प होती. यामुळे शेकडो प्रवाशी वाहनात अडकल्याने अजिंठा व फर्दापुरातील द्राक्षे व पाण्‍याच्‍या बॉटल्‍सची विक्री करणाऱ्यांनी यावेळी चांगलीच कमाई करून घेतली. 40 रूपयांचे द्राक्षे 80 रुपयांना, दहा रुपयाची पाण्‍याची बॉटल चाळीस रुपयांना, एक वडापाव 30 रुपयांना आणि एका पाण्‍याच्‍या पाऊचची पाच रुपयांना विक्री करत घाटातील विक्रेत्‍यांनी चांगलीच कमाई केली.  
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...