आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकची बसला धडक; चालकासह २० जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात एसटी बसच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले. - Divya Marathi
अपघातात एसटी बसच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले.
वाळूज - भरधाव ट्रक एसटी महामंडळाच्या बसवर धडकल्याने झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले. ही घटना वाळूज महानगरातील एएस क्लबसमोरील चौकात शुक्रवारी पहाटे ४.४० वाजता घडली. दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने बसचालक वाहकाला बाहेर पडता आले नाही. दोन क्रेनच्या मदतीने वाहने वेगळी करून त्यांना बाहेर काढण्यात आले. अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद डेपोची बस (एमएच २० डीएल ३३०८) कोल्हापूरहून प्रवासी घेऊन औरंगाबादकडे येत होती. रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी कमी होती. त्यामुळे बस वेगात हाेती. बस वाळूज महानगरातील नवीन मुंबई महामार्ग चाैकालगत आली तेव्हा लिंक रोडवरून तांदूळ घेऊन येणारा भरधाव ट्रक (एमएच ०४ जीबी ३९३२) लासूर स्टेशनकडे जात होता. बसच्या अगोदर चौक ओलांडून पुढे निघण्याच्या बेतात असतानाच भरधाव ट्रक मागील बाजूने बसवर धडकला. त्यामुळे बस दोन वेळा उलटली. दोन्ही चालक, वाहकासह वीस जण जखमी झाले. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

ट्रकचालकाचे दोन्ही पाय मोडले
अपघातातट्रकचालकही गंभीर जखमी झाला असून त्यांचे दोन्ही पाय मोडले. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील इतर जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. पोलिस उपनिरीक्षक आय. जे. जोंधळे, उपनिरीक्षक ए. बी. पाटील, पोलिस जमादार परमेश्वर पायगव्हाणे, योगेश कुलकर्णी यांनी जखमींना मदत केली. एसटीचे सहायक वाहतूक निरीक्षक पी.एस. बिराजदार यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस जमादार पी. ए. मुंजाळ तपास करीत आहेत.

चालक वाहक अडकले
भरधावट्रकच्या धडकेत बस उलटली. त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने बसचालक शंकर धनसिंग शेगवण (३०, रा. अजिंक्यनगर) वाहक बी. जी. पाटील त्यात अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या टू मोबाइल व्हॅन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ताबडतोब दोन क्रेन बोलावून घेतल्या. अडकलेली दोन्ही वाहने वेगळी करून बसचे जखमी चालक वाहकाला काढण्यात आले. त्यानंतर बसमधील जखमी प्रवाशांना चार रुग्णवाहिकांच्या मदतीने उपचारासाठी घाटीत हलवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...