आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारांचा अंत , "अारटीओ'ला चकवा देऊन नगर महामार्गावर दामटला ट्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक पाठलाग करत असल्याने कारवाई टाळण्यासाठी वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक भरधाव जात होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावर राधिका हॉटेलसमोरील चौकात घडली. राहुल सखाराम खजिनदार (२५), विजय शांताराम सुरवाडे (२७, रा. दोघेही मनीषानगर, वाळूज) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या मार्गावर दोन दिवसांत दुसरी घटना घडली.
नगरहून निघालेला हा ट्रक (एमएच २० डीई ७७७६) औरंगाबादकडे येत होता. दरम्यान, राहुल विजय दुचाकीवर (एमएच २० डीएच १५३०) जात होते. ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि दोघेही पाठीमागच्या चाकात आले. ट्रक रस्त्याखाली उतरून एका खड्ड्यात थांबला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघात होताच आरटीओच्या पथकाने पळ काढला. जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, राहुलचा ९.४०, तर विजयचा १० वाजता मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. राहुलचे काका दादासाहेब खजिनदार (रा. दीपनगर, हडको) यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. जमादार आर. डी. राजपूत तपास करत आहेत.
अपघातांची मालिका
नगर-औरंगाबादमहामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. यात २१ नोव्हेंबरला वाळूज येथील अतुल अल्हाट (३४) दुचाकीवर जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने वाळूजच्या गंगा कॉलनीमधील मनीषा विठ्ठल रोडे (४०) यांचा डिसेंबरला अंत झाला होता. त्यांचे पती मुलगी गंभीर जखमी झाले हाेते. १२ डिसंेबरला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत नायगाव येथील सागर शिंदे (२४) भागचंद बोरुडे (५० रा. पद््मपूर ता. गंगापूर) हे दोघेजण मृत्युमुखी पडले. २७ जानेवारीला नवीन मुंबई लिंकरोड चौकातील स्पिडब्रेकरवर कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने बंडू ऊर्फ अशोक रंगनाथ बोराडे (४०, रा.देरडा ता. गंगापूर) यांचा मृत्यू झाला होता.
महिलेचाही मृत्यू
सकाळी अपघाताची घटना ताजी असतानाच सायंकाळी पैठण लिंक रोड चौकात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. सोनाबाई शिवसिंग बहुरे (४०, रा. बुर्जी वाघलगाव, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसोबत जात असताना टँकरच्या धडकेमुळे सोनाबाई रस्त्यावर पडल्या आणि मागच्या चाकात आल्या. टँकरचालक फरार झाला आहे.