आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोन चिमुकले आईच्या मायेला पारखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिराच्या कमानीसमोरून दुचाकीवर जाणाऱ्या दोघींना पाठीमागून येणाऱ्या बारा चाकी ट्रकने धडक दिली. यात मंदा संजय वालतुरे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवणारी केतकी अदवंत (२१) जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. कमानीतून आत जाण्यासाठी वळण घेत असताना हा भीषण अपघात झाला.

पृथ्वीराज नगरातील मंदा त्यांच्या शेजारी राहणारी केतकी ह्या दोघी बुटीकच्या अॅडव्हान्स क्लाससाठी दररोज शिवाजीनगर परिसरात जात असत. नेहमीप्रमाणे मंगळवारी त्या दोघी क्लास आटोपून प्लेजर (एमएच २० सीएम ४०३५) दुचाकीवर जात असताना ट्रकने (पीबी ०२ बीएल ९७८७) त्यांना पाठीमागून धडक दिली. यात मंदा या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा अंत झाला. मंदा यांचा मृतदेह एका खासगी लोडिंग रिक्षाने घाटीत नेण्यात आला, तर केतकीला हेडगेवार रुग्णालयात नेण्यात आले. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या ट्रकचालक केवलसिंग (४५, अमृतसर) याला पकडून सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रक घेऊन जमशेदपूरवरून नाशिककडे जात होता.
दुचाकीवरून पडलेली महिला ट्रकच्या मागील चाकात कधी आली, हे समजले नाही, असे त्याने पोलिस ठाण्यात सांगितले. परंतु ट्रकच्या डाव्या बाजूला समोर घासल्याच्या खुणा दिसून येत होत्या. ट्रकमध्ये खासगी कंपन्यांसाठी लागणाऱ्या स्फोटकांची पावडर असल्याचे केवलसिंगने सांगितले. घटनेनंतर लगेचच सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंग चौहान आणि पोलिस हवालदार सुदाम दाभाडे यांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले.

आतातरी जागे व्हा :
बीडबायपास रोड हा मृत्यूचा सापळा झाला आहे. मात्र प्रशासन आणखी किती निष्पापांचा बळी जाण्याची वाट बघत आहे, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. लहान वाहने जाण्यासाठी हायवेवर दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड होणे अत्यावश्क आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यासंबंधी झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम चौकापर्यंत मोजणीदेखील झाली. अतिक्रमणे देखील हटवली. मात्र सर्व्हिस रोडचे काम कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. गतिरोधक बसवून वाहतूक पोलिसांची येथे नियुक्ती करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आईच्या प्रतीक्षेने मुले अस्वस्थ
मंदायांचे पती संजय हे पुणे येथे जनता सहकारी बँकेत नोकरीस आहेत. त्यांना श्रीकांत आणि ओंकार अशी दोन मुले आहेत. मंदा दुपारी घरी परतल्यानंतरच एकत्र सर्वांचे जेवण व्हायचे. पण मंगळवारी मंदा आल्याने पती मुले अस्वस्थ होती. पण जवळच्या एका परिचिताने आता आई कायमची गेली असे सांगितले अन् सगळेच नि:शब्द झाले.

पुढील स्‍लाइडवर वाचा ...तर जीव वाचला असता...