आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक फोडण्याचा प्रयत्न फसला, भिंतीला भगदाड पाडून चोरटे बँकेत घुसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- अलाहाबाद बँकेच्या वाळूज शाखेची भिंत मागील बाजूने पोखरून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. मात्र स्ट्राँग रूम ‘स्ट्राँग’ अर्थात मजबूत असल्याने ती फोडता न आल्याने चोरटे रिकाम्या हाताने परतले. ही घटना शुक्रवारी (10 मे) रात्री घडली.

पंढरपूर येथे औरंगाबाद-अहमदनगर महामार्गाशेजारी असलेल्या मार्क्‍स शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अलाहाबाद बँकेची वाळूज शाखा आहे. शुक्रवारी सायंकाळी कामकाज संपल्यानंतर कर्मचार्‍यांनी बँक कुलूपबंद केली होती. बँकेच्या मागील भाग निर्जन असल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास तिजोरी असलेल्या खोलीच्या पाठीमागील भिंतीला मोठे छिद्र पाडून बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर भिंत बाहेरून फोडून मोठे भगदाड पाडले व तेथून बँकेत प्रवेश केला. बँकेत शिरल्यानंतर चोरट्यांनी प्रवेशद्वारावर असलेल्या धोक्याची सूचना देणार्‍या सायरनची वायर कापली. नंतर बँकेत कॅशियरच्या केबिनसह इतर ठिकाणी पैशांची शोधाशोध केली. काउंटरवरील ड्रॉवरमध्ये पैशाचा शोध घेतला. मात्र त्यात पैसे सापडले नाहीत म्हणून चोरट्यांनी नवीन खातेदारांचे एटीएम कार्ड लांबवले. स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र ती मजबूत असल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

बँक अधिकार्‍यांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत 5 लाख रुपये ठेवण्याची अनुमती आहे, परंतु ती फोडण्याचा प्रयत्न फसल्यामुळे ही रक्कम सुरक्षित राहिली. शनिवारी सकाळी बँक उघडताच चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस उपनिरीक्षक अनिल कुरुंदकर व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.