आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अडकलेल्या 340 एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत बाहेर हाकलण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी प्रशासनाने विश्रामगृहात थांबलेल्या बाहेरगावच्या ३४० चालक-वाहकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्यवर्ती आणि सिडको आगारात कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री हाय, हायच्या घोषणा देत संताप व्यक्त केला. दिवसभर कर्मचाऱ्यांना हुसकावण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.
 
मात्र वाहकांकडे असलेली रक्कम आणि लॉगशीट जमा करून घ्या आणि आम्हाला मुक्त करा, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. तेव्हा तुम्ही तुमची गाडी घेऊन निघा, असे फर्मान प्रशासनाने सोडले. त्यावर लेखी द्या अन्यथा पोलिसांना बोलावून आम्हाला अटक करा, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. 
 
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, या मागणीसाठी सोमवारपासून संप सुरू केला आहे. यामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात ठाण मांडले आहे. यात बाहेरगावच्या विविध आगाराचे कर्मचारी औरंगाबादेत बस घेऊन आल्यानंतर ते येथेच अडकून पडले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात बाहेरून आलेल्या ७० गाड्या आणि १४० कर्मचारी, सिडको बसस्थानकात १०४ गाड्या आणि २०० कर्मचारी औरंगाबादेत अडकून पडले आहेत. हे कर्मचारी एसटीच्या विश्रामगृहात थांबले आहेत. प्रशासनाने तिसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी या कर्मचाऱ्यांना विश्रामगृह खाली करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे शांततेत सुरू असलेल्या संपाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. 
 
प्रशासनाकडून दबावतंत्र 
कर्मचाऱ्यांचेविश्रामगृह ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते. कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत विश्रामगृह सोडण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काय झाले, विश्रामगृह खाली झाले का, नसेल तर तातडीने खाली करुन घ्यावे अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात येत असल्याने अधिकारी द्विधा मनःस्थितीत सापडले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्रामगृह खाली करा, असे सांगत होते. 
 
एसटी कर्मचारी संपाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परिवहनमंत्री दिवाकर रावते एसटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. १८,००० बसमधील वायफाय यंत्रणेत भ्रष्टाचार झाला आहे. 
 
अधिकारी लेखी देईनात 
दिवसभरकर्मचाऱ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न सुरू होता. सकाळी अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिले. त्यावर कर्मचारी संतप्त झाले. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक चालकाकडे तिकिटांची रोख रक्कम, तिकीट मशीन आहे. बस त्यांच्याच ताब्यात आहेत. हे सर्व जमा करून घ्या आणि लेखी द्या त्यानंतर आम्ही विश्रामगृह सोडण्यास तयार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. अधिकारी मात्र लेखी देण्यास तयार नव्हते. तुम्ही गाडी काढा आणि तुमच्या डेपोला जा असे सांगत होते. गाडी काढली आणि दगडफेक झाली अथवा संपकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...