आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इस्रो'ची महत्त्वाकांक्षी मोहीम फत्ते होताच शहरात दिवाळी, शाळांत "मंगळ'मय जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)मंगळ मोहीम बुधवारी यशस्वी झाली. मंगळयानाने सकाळी ७.१७ वाजता यशस्वीरीत्या मंगळग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला अन् इस्रोच्या संशोधक, शास्त्रज्ञांसह देशभरात जणू दिवाळी साजरी झाली. याला शहरही अपवाद राहिले नाही. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांत या मोहिमेच्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षक, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मंगळ मोहिमेबाबत सविस्तर माहितीही दिली.
भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मार्स ऑर्बिटर यानाने बुधवारी सकाळी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणाऱ्यांच्या निवडक देशांच्या पंक्तीत भारत विराजमान झाला आहे. याचा आनंदोत्सव जसा शास्त्रज्ञांनी साजरा केला त्याप्रमाणेच विद्यार्थी, शिक्षकांनीदेखील साजरा केला. शहरातील शारदा मंदिर, स. भु. महाविद्यालय, पायोनियर्स सेकंडरी स्कूल, आ. कृ. वाघमारे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोनामाता विद्यालयासह अनेक शाळांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छोट्या वर्गांतील विद्यार्थ्यांना या मंगळ यानाची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली.
मंगळ, मंगळ, मंगळ हो...
मंगळ मोहिमेबाबत सोमवारपासूनच उत्सुकता होती. बुधवारी मंगळयानाने मंगळग्रहाच्या कक्षेत प्रवेश करताच इस्रोतील शास्त्रज्ञांनी जसा जल्लोष केला, तसाच उत्सव शाळा, महाविद्यालयांत बघायला मिळाला. बच्चे कंपनीने टाळ्या अन् शिट्या वाजवून जल्लोष केला. या शाळांमध्ये अगदी मंगल मंगल मंगल हो.. असाच नारा घुमला. विज्ञान शाखेचे विद्यार्थीच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनादेखील या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाबरोबरच शाळा, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने हा आनंद साजरा करण्यास सुरुवात झाली होती.