आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tukaram Munde New Municipal Corporation Municipal ?

मनपाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे येणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या१३ दिवसांपासून सुरू असलेला महापालिका अायुक्त नियुक्तीचा सस्पेन्स संपत आला आहे. सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर आयुक्तपदी येणार नाहीत हे स्पष्ट झाले असून जालन्याचे जिल्हाधिकारी रंगानायकही येणार नाहीत. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी औरंगाबाद मनपाला नवीन आयुक्त मिळेल.

गेल्या २० आॅॅक्टोबर रोजी आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर नवीन आयुक्त येणार की निवृत्तीला दोन महिनेच बाकी असताना महाजनांना येथेच राहू द्यायचे याबाबत प्रचंड चर्चा सुरू होती. आता कल्याण- डोंबिवली निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मुख्यमंत्री यात लक्ष घालणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रेकर यांचे प्रमोशन मार्च महिन्यात अपेक्षित असल्याने त्यांची मुळातच मनपात आयुक्त म्हणून यायला इच्छा नव्हती. नगरविकास खात्याने आयुक्तासाठीची सर्च सोलापुरात नेऊन थांबवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना मंत्रालयातून विचारणा केली असता त्यांनी औरंगाबादेत येण्याची तयारी दर्शवली असल्याने त्यांच्या नावावर येत्या दोन दिवसांतच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी मुंडे यांची ११ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. ते मुंबई येथे सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत होते. ते मूळचे बीडचे असून २००५ मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण झाले. याआधी त्यांनी सोलापुरात तहसीलदार म्हणून कामाची चुणूक दाखविली. त्यांच्या काळात बार्शी येथील अतिक्रमण हटाव मोहीम गाजली होती. सोलापुरातील डान्सबारवर बंदी आणण्यावर मोठी कामगिरी केली होती. वाशिम जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आदिवासी विकास प्रकल्पात अतिरिक्त आयुक्त जालना जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

नियमावर बोट ठेवून काम करणारा प्रामाणिक अधिकारी अशी मुंडे यांची प्रतिमा असून त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांसोबत त्यांचा कायमच संघर्ष झडत आलेला आहे.

नावडते अधिकारी : सध्या सोलापुरात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यासोबत झालेला संघर्ष असो पुढाऱ्यांचे नावडते अधिकारी अशी त्यांची ओळख बनली आहे. मात्र नियमाचे काटेकोर प्रामाणिक पालन हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचेही सोलापुरात बोलले जाते.