आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंडेंनी मनपात चौकशी केल्यामुळे अनेकांच्या उरात धडकी, नोकर भरती प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिकेत २०१० ते १३ या कालावधीत लाड समितीच्या तत्त्वानुसार २४० जणांची भरती झाली. यात कर्मचाऱ्यांच्या पाल्यांऐवजी भलतेच नोकरीवर लागल्याचे आरोप झाले. याची चौकशी आता विधानसभेच्या आदेशावरून आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी करत आहेत. गुरुवारी मुंडे मनपा मुख्यालयात आले. त्यांनी संबंधित संचिका मागवून तपासणी केली. ते आपला अहवाल विधानसभेसमोर ठेवणार आहेत. यामुळे पालिकेतील काही अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.

सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर लाड समितीच्या शिफारशीनुसार त्याच्या पाल्याला नोकरी मिळते. मात्र, येथे पाल्यांऐवजी भलत्याच तरुणांना नोकरी दिली. पालिकेत अशा पद्धतीने नोकरी विकण्याची पद्धत आहे. अधिकाऱ्यांनी शहानिशा करता वारसाऐवजी भलत्याच तरुणांना कामावर रुजू करून घेतले. याबाबत यापूर्वीही तक्रार झाली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्य लेखापरीक्षकांकडून चौकशीही झाली होती. मात्र, या मुद्द्यावर अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुंडे यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात येत आहे. मुंडे यांच्यासमवेत मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तसेच पुण्याच्या उपायुक्तांचा समावेश आहे.
 
थेट निलंबनाच्या कारवाईची धास्ती
विधानसभेसमोर अहवाल गेल्यानंतर त्यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अधिकारी धास्तावले आहेत. ही भरती एकाच दिवसात झालेली नाही. जसजसे प्रस्ताव आले तसतशा नियुक्त्या देण्यात आल्या. त्यामुळे उपायुक्त, सहायक आयुक्त, संचिका सादर करणारे येथील कर्मचारी बदलले आहेत. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात नेमके किती जण येणार हे अस्पष्ट आहे.
 
या घोटाळ्यांचीही व्हावी अशीच चौकशी
यापूर्वी पालिकेत गाजलेल्या ११२४ नोकर भरतीची चौकशीही लेखा परीक्षकांकडूनच झाली. मात्र, आता लाड समितीच्या शिफारशींनुसार झालेल्या २४० जणांच्या भरतीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्याने पथदिवे घोटाळा, आरोग्य विभागातील बनावट बिलांद्वारे पैसे उकळणे, औषध खरेदी, टीडीआर घोटाळा, परवानगी घेताच ५२ चालकांची नियुक्ती, भूमिगत गटार योजना, पशु रुग्णालयातील औषध खरेदी, हर्सूल तलावातील गाळ काढणे, बायो मेडिकल वेस्ट, रॅमकीतील अनियमितता, टँकर घोटाळा यांचीही चौकशी अशाच पद्धतीने व्हायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 
यांना मिळाल्या होत्या ‘शो कॉज’
दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियमबाह्यपणे नोकर भरती केली म्हणून प्राथमिक चौकशीनंतर यापूर्वी येथे उपायुक्त राहिलेले उद्धव घुगे अजय चारठाणकर, विद्यमान उपायुक्त रवींद्र निकम, तत्कालीन आस्थापनेचे सहायक आयुक्त सी. एम. अभंग यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. आता मुंडेंकडून यांचीच चौकशी होणार असल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...