आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधा दामोदर चिंतन, शुभमंगल सावधान..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आली समीप लग्नघटिका अशा मंगलाष्टकांच्या पवित्र वचनांच्या साथीने दिमाखदार तुलसी विवाह सोहळा साजरा झाला. शिवशक्तीनगरपासून श्रीकृष्णाची वाजतगाजत वरात काढण्यात आली. यामध्ये महिला-पुरुष आणि तरुणींसह सर्वांनी ताल धरला. माहेश्वरी मंडळाच्या महेशनगर प्रभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या या सोहळ्यात 15 तुळशींचे सामूहिक विवाह लावण्यात आले.
सनई चौघडे अन् मंगलाष्टके :
अहिंसानगरातील शिवगणेश मंदिरात या पवित्र सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक घराच्या अंगणात असलेली तुळस ही मुलीप्रमाणे मानली जाते. श्रीकृष्णासोबत तिचा विवाह लावण्यात येतो. पवित्र मंगल वातावरणात सनई चौघडे आणि मंगलाष्टकांच्या वचनांवर लागलेल्या या विवाहानंतर विवाह मुहूर्त काढण्याची पद्धती आदर्श मानली जाते. हिंदू धर्मातील विवाहांना तुलसी विवाहानंतरच सुरुवात करण्यात येते.

डोळे दिपवणारा सोहळा : गेरूच्या रंगाने आलेल्या लालीत सुंदररीत्या सजवलेल्या तुलसी आणि वाजतगाजत आलेली दामोदर श्रीकृष्णाची मिरवणूक, हा सोहळा डोळे दिपवणारा होता. सर्व वऱ्हाडी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते. भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सुंदर सजावट करून तुळशी मंदिराच्या प्रांगणात मांडण्यात आल्या होत्या. दिव्यांची आरास लक्षवेधी होती. सुबक रांगोळ्यांनी वरातीचे स्वागत झाले.
मोरावरून वरात
घोड्यावरून वरात काढण्याची पद्धत अस्तित्वात आहे. मात्र, माहेश्वरी समाजात या उत्सवाचे विशेष महत्त्व लक्षात घेता प्रभागाच्या सदस्यांनी यंदा वेगळेपणा आणण्यासाठी आकर्षकरीत्या तयार केलेल्या मोराच्या प्रतिकृतीवरून श्रीकृष्णाची वरात काढली. सजवलेला हा मोर सर्वांचे लक्ष वेधून गेला. विवाह सोहळ्याला संगीता करवा, रेणुका बजाज, पूनम मणियार, गीता मालानी, अंजू बजाज, भावना सोनी, शोभा बागला, सुधा खटोड, ज्योती झंवर, ज्योती राठी, सरिता मालपाणी, राजू सोनी, नितीन भक्कड, उमेश झंवर, कांतीलाल मालपाणी, प्रशांत मालानी, दिनेश कालानी, प्रवीण नागोरी, सुनीता बागला यांची उपस्थिती होती.