आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोगाने किडनी निकामी तरी जगाला हसवण्याची ऊर्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - किडनीच्या कर्करोगासारख्या असाध्य आजारांतील वेदना विसरून प्रेक्षकांना खदखदून हसवणारे तुलसीदास चौधरी हे दी ग्रेट बॉम्बे सर्कसमधील हुकमी एक्का. गत ५० वर्षांपासून माकडचेष्टा करून प्रेक्षकांना हसवणाऱ्या चौधरी यांची किडनी कॅन्सर झाल्यामुळे काढावी लागली. प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रियाही झाली. पूर्ण वेतन देऊ आराम करा, असे कंपनीने सांगूनही इथेच मृत्यू यावा, याबाबत ते आग्रही आहेत.
बिहारमधील छपरा हे चौधरींचे मूळ गाव. गावी भरपूर शेती तसेच आई-वडील, भाऊ, बहिण असा संपन्न परिवार आहे. उंची कमी असल्याने गावात होणारी अवहेेलना जीवघेणी वाटायची. त्यातच गावात दी ग्रेट बॉम्बे सर्कस आली अन् १५ वर्षांचे तुलसीदास चौधरी त्यात सामील झाले. बॉम्बे सर्कसचे भागीदार के.एम. बालगोपाल मुलासारखे वागवायचे. त्यांची मुले आणि आताचे संचालक संजीव, दिलीप यांना तर चौधरींनी अंगाखांद्यावर खेळवले आहे. ३५० जणांच्या या कुटूंबात सर्वजण मामा म्हणून त्यांना हाक मारतात.

१० वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया : रिंगमास्टर आणि अन्य कलाकार थरारक कसरती करत असतांना प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याची कामगिरी चौधरी चोखपणे बजावतात. प्रेक्षक आपल्याला हसतात हे पाहून सुरुवातीला त्यांना रडू यायचे. पुढे याची सवय झाली. आता पासष्टी उलटल्यानंतरही प्रेक्षकांना हसतांना पाहून त्यांना वेदनांचा विसर पडतो.

त्यांना किडनीचा कर्करोग असल्याचे २००६ मध्ये निदान झाले. इंदूरच्या अपूर्वा हाॅस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून किडनी काढावी लागली. प्रोस्टेट ग्रंथीवरही शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधीपर्यंत त्यांनी सर्कशीत शो केला. किडनी काढल्यानंतर कष्टाची कामे करू नका, असे डॉक्टरांनी बजावले. यामुळे संजीव बालगोपाल यांनी चौधरींना गावी पाठवले. त्यांना सर्कशीत मिळणारे मानधन देऊ केले. मात्र, महिनाभरातच ते परतले. सर्वांनी खूप समजूत घातली. पण ते घरी जायला तयार नाहीत. अखेरच्या श्वासापर्यंत सर्कशीत काम करणार आहे. शो सुरू असतांनाच मरण आले तर मी भाग्य समजेल, असे ते सांगतात. औरंगाबादेत सर्कस आली त्यावेळी तुलसीदास यांनी सर्कशीतील ५० वर्षे पूर्ण केले. या निमीत्ताने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आजही शो सुरू होताच तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने ते प्रेक्षकांना सामोरे जातात. मुलांना खळखळून हसताना पाहून आपले वयही विसरतात, शो संपला की वेदना वयाची आठवण करून देतात. मात्र, त्यांनाही हसायला लावत "मामा’पुढच्याशोची तयारी सुरू करतात.

शो सुरू असतानाच व्हावी अखेरची एिक्झट...
^जसे कळायला लागले, तेंव्हापासून सर्कसमध्ये काम करत आहे. स्वत:चे दु:ख विसरून आयुष्यभर लोकांना हसवले. कन्सर झाला. किडनी काढावी लागली. पण सर्कसमुळे कष्टाची, संघर्षाची सवय पडली. यामुळेच संकटावर मात करता आली. म्हणूनच घरी न जाता सर्कसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. शो सुरू असतानाच अखेरची एिक्झट व्हावी, अशी इच्छा आहे. -तुलसीदास चौधरी, जोकर, बॉम्बे सर्कस
बातम्या आणखी आहेत...