आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांनंतर यंदा प्रथमच औरंगाबाद जिल्ह्यात तुरीचे बंपर उत्पादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - तूर या डाळवर्गीय पिकात गेल्या पाच वर्षांपासून उत्पादनात कमालीची घट होत चालली होती. त्यामुळे डाळीचे भाव दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. परिणामी सामान्यांच्या ताटातील तुरीचे वरण गायब झाले होते, तर मागील वर्षी उत्पादन अत्यल्प असल्याने भाव तेरा ते चौदा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला होता.
 
डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढवावे  म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचा चांगला परिणाम तुरीच्या उत्पादनावर झाला आहे. शासनाच्या उपक्रमामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १० कोटी ८४ लाख ३० हजार रुपये किमतीची २१ हजार ४७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाची ही खरेदी १५ मार्चपर्यंत चालणार असून तूर खरेदी यापुढेही चालू राहावी म्हणून प्रयत्न होत आहेत.  

गेल्या पाच वर्षांपासून कमी पाऊस व योग्य भाव मिळत नसल्याने डाळवर्गीय पिकांत कमालीची घट आली होती. डाळ आयात करून स्वत: धान्य दुकानांतून विकावी लागली होती. शासनावर अशी नामुष्की यापुढे येऊ नये म्हणून कडधान्य व डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात व उत्पादनात वाढ व्हावी म्हणून कृषी विभागाने विविध योजना राबवल्या. यात शेतकऱ्यांना बियाण्यांच्या किट मोफत देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना प्रदर्शनी प्लॉट देण्यात आले.
 
तसेच मिश्र पीक घेण्यासाठी कृषी मेळावे, प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्याचाच परिपाक म्हणून शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार कडधान्ये व डाळवर्गीय पिकांचे नियोजन करून भरमसाट उत्पन्नात भर घातली. यामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आल्याने केंद्र शासनाला शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून बाजारात उतरावे लागले.
 
अगोदर म्हटल्याप्रमाणे मागील पाच वर्षांत तुरीचे नगण्य उत्पन्न असल्यामुळे शासनाने जिल्ह्यात सन २०१४-१५, १५-१६ या वर्षात तूर खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. २०१३-१४ मध्ये शासनाने जिल्ह्यात केवळ वैजापूर येथे शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. त्या वेळी केंद्रावर १७९ शेतकऱ्यांची २८९६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. 
 
यावर्षी तुरीचे बंपर पीक आल्यामुळे शासनाला शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करावी लागली.जिल्ह्यात औरंगाबाद,  लासूर स्टेशन, गंगापूर, वैजापूर, पैठण येथे तूर खरेदी चालू आहे. काही ठिकाणी बारदाणा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी बंद होती. आता सर्वत्र बारदाणा उपलब्ध झाला आहे. खरेदी १५ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. १५ मार्चनंतर पुढेही तूर खरेदी चालू राहावी यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे प्रयत्न चालू आहेत.
 
राज्यात ३५४ कोटींची तूर खरेदी  
केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने राज्यात दि. १५ डिसेंबरपासून तुरीची खरेदी करण्यात येत आहे. पणन महासंघाकडून नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्यातील १२५ खरेदी केंद्रांवर ९ लाख ९२ हजार ८३९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. - सुभाष पोफळे, विभागप्रमुख, मार्केटिंग फेडरेशन

प्राप्त होताच पेमेंट देऊ : २१ हजार ४७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून यापैकी ३५३१.९५ क्विंटलचे पेमेंट सुमारे एक कोटी ७७ लाख ८५ हजार ८४८ रुपये नाफेड व एफसीआयकडून प्रप्त झाले नाही. प्राप्त होताच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगन्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...