आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात शेतकऱ्यांच्या हातावर 'तुरी' देऊन प्रशासन बसले गप्प!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - राज्यभर गाजत असलेला तूर खरेदीचा प्रश्न अजूनही कायमच आहे. वैजापूर तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक तूर खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी महिनाभरापासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय पातळीवरील अधिकारी वरिष्ठांकडून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे तूर खरेदी करता येणार नसल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.  परिणामी तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर शिलकी तुरीची विल्हेवाट कशी लावावी,  असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  
 
तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक तजवीज करण्याच्या तयारीत असलेल्या  शेतकऱ्याची तूर विक्रीसाठी घालमेल चालू अाहे. प्रशासकीय पातळीवर हमी भावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याने तो चिंतातुर झाला आहे.
 
गेल्या वर्षी तूरडाळीच्या भावाने प्रतिकिलो २०० रुपयांचा टप्पा गाठल्यामुळे पंतप्रधानांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना किफायतशीर भावाचे गाजर दाखवत तूर लागवडीसाठी प्रोत्साहित केले होते. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नाफेडच्या माध्यमातून तुरीची हमी भावाने खरेदी करून  दिलासा दिला होता.
 
मात्र  वैजापूर येथील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी मनमाड येथील भारतीय खाद्य निगम मंडळाच्या पुढाकारातून तूर खरेदीचा घाट घातला होता. २१ डिंसेबर २०१६ ते २२ एप्रिल २०१७ या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत या शासकीय खरेदी केंद्रात केंद्र प्रमुखांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना प्रतवारीच्या मुद्द्यावर वेठीस धरून अवघ्या ९९७ शेतकऱ्यांकडून  ५ हजार १६८ क्विंटल तूर खरेदी करून  २२ एप्रिलपासून हमी केंद्र बंद केले.   
 
मुदतवाढीसाठी पाठपुरावा  
तूर खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी यासाठी बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील, संचालक भागीनाथ मगर, ज्ञानेश्वर पा.जगताप यांनी महिनाभरात तीनदा जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा  केला. मात्र प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे  आदेश नसल्यामुळे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत.  
 
शेतकऱ्यांना झळ  
जानेवारी ते एप्रिल दरम्यान हमी केंद्रातून नाकारलेल्या तुरीला व्यापाऱ्यांनी  ३५०० ते ४२०० रुपये क्विंटल दर देऊन पंधरा हजार क्विंटल तुरीची खरेदी केली. तूर उत्पादक शेतकऱ्यांकडील चांगल्या प्रतीची तूर व्यापारी लिलावात ३३०० ते ३८०० रुपये या दराने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.  
 
सुरू करण्याचे आदेश नाहीत
शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे गळ घातली होती. मात्र तहसीलदार सुमन मोरे यांनी वरिष्ठ पातळीवरूनच आदेश नसल्यामुळे केंद्र सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींना साकडे घालणार
प्रशासन कागदोपत्री आदेश नसल्यामुळे तूर खरेदी केंद्र सुरू करत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या  या गंभीर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आमदार भाऊसाहेब पा.चिकटगावकर यांना साकडे घालणार असल्याचे बाजार समितीचे संचालक भागीनाथ मगर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...