आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम सत्राच्या पेपरमध्ये पुन्हा द्वितीय सत्राचे प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सलग तिसऱ्यांदा विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ झाला आहे. प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रातील २५ गुणांचे प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. हा प्रकार पुन्हा केमिस्ट्रीच्याच पेपरमध्ये झाला असून त्यामुळे ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पेपरच रद्द करावा लागला आहे. आता हा पेपर १७ नोव्हेंबरला घेण्यात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शुक्रवारपासून एमए, एमकॉम, एमएस्सी आणि बीपीएड, एमपीएडच्या सत्र परीक्षांना सुरुवात झाली. या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ८०९ विद्यार्थी बसले आहेत, तर एमएस्सीसाठी ४ हजार १५१ विद्यार्थी आहेत.

एमएस्सीचा सोमवारी (१० नोव्हेंबर) ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयाचा पेपर होता. मात्र, प्रथम सत्राचे पेपर असताना त्यात २५ गुणांचे प्रश्न हे द्वितीय सत्राचे विचारण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. ५० गुणांचा पेपर आता सोडवायचा कसा? प्रश्न तर चुकीचे असल्याने विद्यार्थी गोंधळले होते.
ही बाब केंद्रप्रमुखांना सांगण्यात आल्यावर विद्यापीठाशी संपर्क करण्यात आला. प्रिंटिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे सर्व प्रकार घडल्याचे सांगत ऐनवेळी दुसऱ्या प्रश्नपत्रिका देणे शक्य न झाल्याने हा पेपर रद्द करण्यात आला. १५ नोव्हेंबर रोजी एमएस्सीची परीक्षा संपते आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी हा पेपर घेण्यात येणार आहे.
तिसऱ्यांदा घडला प्रकार
हायटेक विद्यापीठ व्हावे म्हणून बारकोड आणि ऑनलाइन प्रश्नपत्रिका देण्यास विद्यापीठाने सुरुवात केली. मात्र, ७ नोव्हेंेबरपासून सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये आतापर्यंत सलग तीन पेपरमध्ये चुका झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी केमिस्ट्रीच्याच पेपरमध्ये प्रिंटिंगच्या चुका होत्या. दुसऱ्या दिवशी फाॅरेन्सिक सायन्स आणि आज पुन्हा केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये चूक झाली आहे.
झालेल्या प्रकारात चूक सर्वांचीच
जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटिंगमधील चुकांमुळे हा प्रकार पुन्हा घडला. मात्र, वेळेअभावी आज पुन्हा प्रश्नपत्रिका देता आली नाही. त्यामुळे हा पेपर रद्द करण्यात आला असून पुन्हा या विषयाचा पेपर १७ नोव्हेंबरला घेण्यात येईल. झालेल्या प्रकारात सर्वांचीच चूक आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, परीक्षा नियंत्रक.