आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही मालिकांनी साहित्यापासून फारकत घेतली : भडकमकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निर्बुद्ध मनोरंजन करतांना सुमार दर्जाच्या लोकांच्या हातात माध्यम गेले. मालिकांचा उंट घरात घुसून माणसांना बधीर करीत आहे. टीव्हीवरील मालिकांनी साहित्यापासून फारकत घेतली आहे. बौद्धिक अध:पतनात निश्चित मांडणी नसलेल्या वाहिन्या एकमेकांसोबत आंधळ्यांच्या रांगेत चालत आहेत, असे प्रतिपादन लेखक अभिराम भडकमकर यांनी केले. लेखक- वाचक अभियान या दोन दिवसांच्या उपक्रमाचा रविवारी गोविंदभाई श्रॉफ सभागृहात समारोप झाला. लेखक पटकथाकार अभिराम भडकमकर यांचे 'तंबूत शिरलेला मालिकांचा उंट’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रा.अजित दळवी होते. आनंद अवधानी, श्याम देशपांडे यांची उपस्थिती होती.
भडकमकर म्हणाले, पूर्वी मालिकेतील चेहरे नाटकात असल्याचे लोकांना अप्रूप होते. मालिकांचा उंट तेव्हा पिल्लू होता. नवीन माध्यमांची टिंगल करण्याची पद्धत आहे. त्यामुळे नवे माध्यम दुर्लक्षामुळे एवढे विकृत होते की संवेदनशील कलाकारांनाही नंतर शरण जावे लागते. सद्यस्थितीत साहित्याला शरण जाणारे माध्यम फटकून वागत आहे. मालिकांनी मध्यमवर्गाचा चेहरा बदलला. शेती,कामगार,धार्मिक,सांस्कृतिक प्रश्नांना हात घालणे त्यांना डाऊन मार्केट वाटते. वरवरचे बोलत त्यांनी वेगळ्याच विश्वाची निर्मिती केली आहे. खिरीत विष घालणाऱ्या आणि कट कारस्थानात गुंतलेल्या मालिकेतील महिला कोणत्या घरातील आहेत, असा प्रश्न पडतो. याच कारणामुळे मालिका लेखन करण्यास मी स्पष्ट नकार दिला. मेंदी, संगीत असे मराठी कुटुंबात नसलेल्या प्रथांनी शिरकाव केला आहे. मालिकांच्या रेट्यात प्रादेशिक ओळखसुद्धा नष्ट झाली आहे. मालिकेत कथा मागे पडली असून १९ मिनिटांचे नाट्य उरले आहे. फक्त प्रेक्षकांना बधीर करण्याचे काम सुरू आहे. मालिकांनी नाटकाचे कलाकार तंत्रज्ञ पळवले. लेखनासाठी मेंदूला निवांतपणा आवश्यक असतो. लेखकाला निवांतपणा कधीच नाही. लेखकाचा मेंदू २४ तास जखडलेला असतो, असेही भडकमकर म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रा.अजित दळवी यांनी केला. ते म्हणाले, जखमेवर मीठच काय आपण गरम मसाला चोळू या प्रकारचे संवाद प्रेक्षक म्हणून सन्मान गमावण्यासारखे वाटतात. तर आपण माठ वाटू लागतो. या वेळी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...