आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात जुळ्या मुलांना रेल्वेत सोडून माता पसार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नवजात जुळ्या अर्भकांना नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वेत सोडून माता पसार झाल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. जुळ्यांना पहाटे 4 वाजता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही अर्भके मुले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तीन दिवसांच्या या जुळ्यांपैकी एकाचे वजन अडीच, तर दुसर्‍याचे सव्वादोन किलो आहे. नांदेडहून आलेली पॅसेंजर (क्र. 57542) औरंगाबादेत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली. प्रवासी उतरत होते. तितक्यात एका सफाई कर्मचारी महिलेचे लक्ष कपड्यामध्ये गुंडाळलेल्या रडणार्‍या अर्भकांवर गेले. तिने रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. . बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर अर्भकांना घाटीत दाखल करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 24 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळांच्या देखरेखीसाठी विजया कदम व श्वेता दणके या महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाच ते सात दिवसांत आईचा शोध घेतला जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक आर.एम. गाडे म्हणाले. सात दिवसांनंतर बाळांना बालगृहाकडे सुपूर्द केले जाईल.
चाइल्डलाइनशी संपर्क
चाइल्डलाइनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर नोडल संस्थेच्या दोघांनी पोलिसांशी संपर्क साधून मुलांना घाटीत नेले व संस्थेला अहवाल दिला. चाइल्डलाइनतर्फे देशात 300 बालगृहे चालवली जातात.

मुकुंदवाडीत सोडले!
पॅसेंजर रात्री मुकुंदवाडी स्थानकात थांबली. त्याच वेळी बाळांची आई त्यांना सोडून फरार झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. डब्यातील स्वच्छतागृहाजवळ कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत ही जुळी मुले आढळून आली होती.