आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाचखोर गजाआड, नगर रचनाच्या अधिकाऱ्यांची पाच लाखांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद सोनबा गायकवाड आणि सहायक नगर रचनाकार संजय यशवंतराव टोणपे यांना ५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रविवारी रात्री अटक केली. जमिनीच्या अकृषक रूपांतरणासाठीचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली.

एसबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरणापूर येथील गट क्र. ५ मधील २३ गुंठे जमीन अकृषक करण्यासंदर्भात अर्जदाराने नगर रचना विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर करण्यासाठी सहायक संचालक प्रसाद गायकवाडने (४१, प्राइड रेसिडेन्सी, रेल्वेस्टेशन एमआयडीसी) ५ लाख रुपये मागितले. ही रक्कम सहायक नगर रचनाकार संजय यशवंतराव टोणपेकडे (५२, शिवम अपार्टमेंट, ज्योतीनगर) देण्यास सांगितले. मात्र अर्जदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार रविवारी रात्री एसीबीने सापळा लावला.

टोणपेच्या घरी सापळा : ठरल्याप्रमाणे अर्जदाराने ५ लाख रुपये घेऊन टोणपेचे घर गाठले. रात्री सव्वाआठच्या सुमारास लाचेची रक्कम घेताना एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. त्याने गायकवाडच्या वतीने लाच घेत असल्याचे सांगितल्यानंतर गायकवाडला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

घरांची झडती : एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडतीत गायकवाडच्या घरातून १ लाख रुपये आणि सोने हस्तगत, तर टोणपेकडे ५० हजारांची रोकड सापडली.