आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीवर थाप मारून काढायचे छेड; संतापलेल्या महिलांनी दोन सख्ख्या भावांना शिकवला धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको परिसरातील महिलांसह मुलींच्या पाठीवर थाप मारून छेड काढणाऱ्या विकृत मानसिकतेच्या दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी रविवारी त्यांना अटक केली. त्यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र कारवाई झाल्यामुळे हा प्रकार सुरूच होता. अखेर या भागातील महिलांनी सकाळी सिडको पोलिस ठाणे गाठत दुर्गावतार धारण केल्यानंतर पोलिसांनी दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. बाळू आश्रुबा पैठणे (३५) आणि सतीश आश्रुबा पैठणे (३९) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, महिलेने तक्रार दिल्यानंतर दोघांनी परिसरातील काही वाहनांची तोडफोड करत महिला तिच्या पतीला धमकी दिली होती. 

मथुरा नगरातून ये-जा करणाऱ्या महिलांच्या पाठीवर अचानक थाप मारण्याचे प्रकार पैठणे बंधू करायचे. शुक्रवारी सायंकाळी अंगण झाडणाऱ्या महिलेची या विकृत भावंडांनी छेड काढली. तेव्हा परिसरातील नागरिक दोघांना समजावण्यासाठी गेले. त्या वेळी दोघांनी नागरिकांना मारहाण करून महिलेसह तिच्या पतीला पोलिसांत तक्रार केल्यास कापून टाकीन, जाळून टाकीन अशा धमक्या दिल्या. त्यावरून महिलेने पैठणे भावंडांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करता सोडून दिले. त्यामुळे या दोघांची हिंमत वाढली. त्यांनी परिसरातील नागरिकांची वाहने ढकलून दिली. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर रविवारी ५०-६० महिला सिडको पोलिस ठाण्यात एकत्र आल्या. त्यांनी सिडको पोलिसांना याबाबत विचारणा केली. काही वेळानंतर पोलिसांनी हे दोघेही मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. पण रहिवाशांचा संताप अनावर झाल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. 

दोन दिवसांपूर्वी तक्रार 
पीडित महिलेने दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली आहे. आता दोघांना अटक करण्यात आली. आम्ही महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ. 
- कैलास प्रजापती, वरिष्ठ निरीक्षक, सिडको पोलिस ठाणे. 

महिला सुरक्षेबाबत केवळ चर्चा 
राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारीदेखील केवळ महिला सुरक्षेबाबत चर्चा करतात. प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी छेडछाडीचे प्रकार सुरूच आहेत. पोलिसांकडून हे प्रकार थांबवण्यासाठी नवीन पथक तयार झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अशा प्रकारचे पथक काम करताना दिसत नाही. 

दामिनी पथक गेले कोठे? 
दिवसाढवळ्या शहरातील अनेक भागांत महिला आणि तरुणींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिला आणि तरुणी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. मात्र छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी अस्तित्वात असलेल्या दामिनी पथकाची कारवाई मात्र होताना दिसत नाही. महाविद्यालय परिसर सोडता हे पथक इतर भागात गस्तीवर दिसत नाही. 
बातम्या आणखी आहेत...