आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिठाच्या डब्यात कालवले विष, कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव- शेतकरी कुटुंबीयांचे कर्जमाफीच्या यादीतही नाव समाविष्ट न झाल्याने कर्ज फेडण्याची चिंता आणि पाल्यांच्या शिक्षणाची भेडसावणारी चिंता यामुळे गोंधळलेल्या शेतकऱ्याने भाकरीचे पीठ असलेल्या डब्यात विषारी औषधाची कालवण करून संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंबायती (न्हावी तांडा) ता.सोयगाव येथे सोमवारी(दि.२०) रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेतील विषबाधित झालेल्या तीन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान जळगावच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.  


निंबायती (न्हावी तांडा) ता.सोयगाव येथील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला  अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता महिनाभरापासून भेडसावत होती. पाच एकर क्षेत्रावर लावलेल्या कपाशी पिकाचे तुटपुंजे उत्पन्न निघाले. त्यातही कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने बेभाव कापसाची विक्री करावी लागली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता असलेल्या शेतकऱ्याला रब्बीसाठी पैसाच जवळ नव्हता. मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावत असलेल्या शेतकऱ्याने कुटुंब संपविण्याचा निर्धार करून सोमवारी (दि.२०) सायंकाळी शेतातून पत्नीच्या आधी घरी येऊन भाकरीच्या पिठाच्या डब्यात पोलो नावाचे औषध मिसळवून टाकले. पत्नी कावेरीबाई नियमित शेतातून घरी येऊन कुटुंबीयांसाठी स्वयंपाक करत होती. हा प्रकार तिच्या लक्षातच आला नसल्याने संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असताना पती राजू रतन राठोड याने तुम्ही जेऊन घ्या मी नंतर जेवतो, असे सांगून बाहेर निघून गेला.

  
राजू हा अद्यापही परतलेला नाही. रात्री दहा वाजेच्या नंतर पत्नी कावेरीबाई राजू राठोड (३२), मुलगी ज्योती राजू राठोड (१३), गोगली राठोड (८), मुलगा राहुल राजू राठोड (१०), दिनेश दिलीप राठोड (१०) या पाच जणांना रात्री उलट्या होऊ लागल्याने तातडीने उपचारासाठी पिंपळगाव (हरे) जि.जळगाव  येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता मुलगी ज्योती राजू राठोड (१३), गोगली राजू राठोड (८) या दोघांचा उपचारादरम्यान  मंगळवारी मृत्यू झाला तर पाठोपाठ राहुल राठोड याचा देखील उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. तसेच दिनेश राठोड, पत्नी कावेरीबाई राठोड या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  


या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक स्थिती खालावलेल्या शेतकऱ्याचा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उद्भवल्याने ही घटना घडल्याने तालुकावासी भयभीत झाले आहेत.  

 

जळगावच्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 
दरम्यान, या घटनेप्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तिन्ही चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्याचे सहायक  पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी निंबायती (न्हावी तांडा)  गावांना तातडीच्या भेटी दिल्या व घटनेची माहिती घेतली. दरम्यान, या प्रकरणी तालुका प्रशासनाच्या पथकाने अद्यापही भेटी देण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...