लासूर स्टेशन- गंगापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गवळी शिवरा येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन मुलांचा (एक मुलगा व मुलगी) लघु प्रकल्पातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश साहेबराव भोसले (९), रा. वसुसायगाव आणि प्रणाली बाळासाहेब नेमके (१०), रा.लासूरगाव (ता.वैजापूर) अशी मृत मुलांची नावे आहेत.
शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील प्रणाली बाळासाहेब नेमके ही ही वसुसायगाव येथे मामाच्या गावाला आली होती. वसुसायगाव येथील ज्ञानेश साहेबराव भोसले आणि प्रणाली हे दोघे गवळी शिवरा येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी खेळत निघाले होते. गवळी शिवरा रस्त्यावरील लघु प्रकल्पावर गेल्यानंतर दोघांचाही पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्यात गाळ असल्याने त्यांना लवकर बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी दोघांना बाहेर काढून लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे वसुसायगाव तसेच लासूरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे अधिक तपास करीत आहेत.