औरंगाबाद - सातारा तांड्याच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोघांचा सोमवारी (१५ सप्टेंबर) बुडून मृत्यू झाला. दोघेही गजानननगरील रहिवासी आहेत. मृत गणेश लिंबाजी धाकपाडे (२०) हा शरदचंद्र पवार तंत्रनिकेतनचा, तर राहुल भरत शिंदे (१९) हा वसंतराव नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
इलेक्ट्रिकलच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या गणेशला महावितरण कंपनीत नोकरीही लागली होती. तो ७ ऑक्टोबर रोजी कामावर रुजू होणार होता. पण हे नियतीला मान्य नसल्यामुळे गणेशचा अभियंतादिनीच मृत्यू झाला.
गणेश धाकपाडे, राहुल शिंदे, जयेश निकम आणि रवी वैद्य हे चौघे सातारा तांडा तलावात पोहण्यासाठी गेले. उन्हाळ्यात गावकऱ्यांनी तलावातील गाळ उपसल्याने त्याची खोली वाढली आहे. चौघांनी एकानंतर एक तलावात उड्या घेतल्या. पण चौघांनाही तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही. सुरुवातीला काही वेळ चौघांनी पोहण्याचा आनंद लुटला. मात्र, आधी गणेश आणि नंतर राहुल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने जयेश आणि रवी यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु जयेशही पाण्यात बुडण्याच्या स्थितीत असताना त्याला रवीने किनाऱ्यावर आणले.
गणेश आणि राहुल बुडाले. या घटनेची माहिती त्यांनी
मोबाइलवरून सातारा पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे दोघांपैकी एकाने सातारा ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली.
गजानन नगरावर शोककळा
ही वार्ता गजानननगरात वाऱ्यासारखी पसरली. गणेश आणि राहुल दोघेही एकाच वसाहतीतील असल्यामुळे शेजाऱ्यांनी सांत्वनासाठी त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली. गणेशचे वडील लिंबाजी धाकपाडे हे महावितरण कंपनीत कनिष्ठ तंत्रज्ञ आहेत. हे कुटुंब परभणी जिल्ह्यातील शिरपूरचे रहिवासी असून त्यांचा धाकटा मुलगा अविनाश एमजीएम महाविद्यालयात तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षात शिकत आहे. राहुलचे वडील भरत शिंदे हे सेंट लॉरेन्सच्या स्कूल बसवर चालक आहेत.
गणेशच्या वडिलांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, गणेशला महावितरण कंपनीत तृतीय श्रेणीच्या पदावर नोकरी मिळाली होती. ७ ऑक्टोबर रोजी त्याला रुजू होण्याचे आदेश होते. पण अभियंतादिनीच त्याने प्राण गमावले. अग्निशमन दलाचे घाटेशाही यांच्यासह कुलकर्णी, अब्दुल अजीज, अशोक वेलदोडे, सुभाष दुधे यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. सातारा ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून जमादार सय्यद हनीफ तपास करत आहेत.
चौथ्याने जीव धोक्यात घालून तिसऱ्याला वाचवले
मुकुंदवाडीच्या जिजामाता कॉलनीत राहणारा १९ वर्षीय रवी अशोक वैद्य याने
आपला जीव धोक्यात घालून जयेश भीमराव निकमचे (२१) प्राण वाचवले. गणेश आणि राहुल या दोघांना वाचवण्यासाठी तलावाच्या केंद्रस्थानी गेलेल्या जयेशलाही जलसमाधी मिळत होती, मात्र रवीने त्याला आधार देऊन तलावाच्या किनाऱ्यावर सुखरूप आणले. त्यानंतर या दोघांनी जवळच असलेल्या गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. या तलावात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून त्यापैकी बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते, असे सातारा तांड्याच्या ग्रामस्थांनी सांगितले.
अन् मृतदेहच हाती लागले
पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, उपनिरीक्षक महेश टाक, सहायक फौजदार दिगंबर कापडणे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. दरम्यान, अग्निशमन दलातील ड्यूटी इन्चार्ज शरद घाटेशाही यांनीही दुपारी सव्वादोनच्या सुमारास बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पथकातील एस. एस. कुलकर्णी यांनी सुमारे पंचवीस फूट तळात फसलेला एक मृतदेह दुपारी ३.१५ वाजता बाहेर काढला. दुसरा मृतदेह शोधण्यासाठी एक तास लागला. ४.२० वाजता दुसरा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. दोन्ही मृतदेह साडेचारला उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले.