लहान वयात पितृछत्र हरपले. त्यातून खचून न जाता दोन युवक कमवा आणि शिका ही वृत्ती ठेवून स्वत: शिक्षण घेत आहेत. स्वावलंबी होतानाच कॉलेज संपल्यावर अपंग व मूकबधिर मुलांसाठी मयूर पार्क येथे खास व्यायामशाळा चालवत आहेत. ही मुले शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावीत तसेच विविध क्रीडा स्पर्धांतही ती चमकावीत आणि यातूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठीच आम्ही हा खटाटोप केल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.
शासकीय महाविद्यालयात बीए अंतिम वर्षात शिकणाऱ्या या दोन तरुणांची नावे शेख सलमान आणि शेख आमेर अशी आहेत. शिक्षणाबरोबरच पोलिस भरतीकडेही त्यांनी लक्ष घातले. यासाठी व्यायामाची गरज असल्यामुळे यातून जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी स्वत: काम करून काही पैसे जमवले. उरलेले नातेवाइकांकडून व िमत्रांकडून जमा केले आणि मयूर पार्क भागात त्यांचा ही व्यायामशाळा सुरू झाली. पहाटे व संध्याकाळी व्यायामशाळेकडे लक्ष देतात.
अपंग- मूकबधिरांना मोफत प्रवेश
अपंग आणि मूकबधिर मुलांसाठी काही तरी करावे ही इच्छा मनात आली आणि आम्ही ही व्यायामशाळा उभारली. त्यामुळे या मुलांना आमच्या जिममध्ये मोफत प्रवेश दिला जातो, असेही या दोघांनी सांगितले. या प्रशिक्षणात ५० मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले औरंगाबाद पब्लिक हायस्कूल, शासकीय ज्ञान-विज्ञान महािवद्यालयातील आहेत. सकाळी ६ ते ९ आणि सांयकाळी ५. ३० ते १० या वेळेत त्यांना प्रशिक्षण दिले जाते. पाठ, खांदा, ट्रायसेप, अप्पर बॉडी, पायांसाठी योगा थेरपी, मणक्याचे व्यायाम यात शिकवले जातात.
-अपंग आणि मूकबधिर मुलांसाठी आमच्या मनात काही करण्याची इच्छा होती. अशा मुलींसाठीही आम्ही अशा प्रकारच मोफत व्यायामशाळा सुरू करू. त्यासाठी महिला प्रशिक्षक ठेवण्याचाही आमचा मानस आहे.
-शेख सलमान, व्यवस्थापक
-आम्हाला कामातून आनंद मिळतो. अपंगा आणि मूकबधिर अशी मुले क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. पॉवर फ्टिंग करू शकतात. त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
-शेख आमेर, व्यवस्थापक,
-आमच्या अपंग व मूकबधिर मुलांना खरी गरज या दोन युवकांनी पुरवली आहे. व्यायामातील विविध प्रकारामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे. ते अनेक खेळांमध्येही रुची घेत आहेत.
-सय्यद शब्बीर, शिक्षक, औरंगाबाद पब्लिक स्कूल
-मुलांना अशी संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे. क्रीडा स्पर्धेत अशी अपंग, मूकबधिर मुले पोहोचू शकतात. हा चांगला उपक्रम युवक राबवत आहेत.
-शेख मोहसीन, शिक्षक
- आम्हाला व्यायामशाळेत मोफत प्रवेश मिळाला. कमजोर पायांना व्यायाम होत आहे. शरीर चांगले तर सर्वच चांगले असल्यामुळे मुलेही क्रीडा क्षेत्राकडे वळत आहेत.
-रणजित सरडे, अपंग विद्यार्थी