आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य ही खेळाची कॉमेंट्री नव्हे; ते वास्तवाचे प्रतिबिंब- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे परखड मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राजकीय, सामाजिक आणि आधुनिकतेबरोबरच समाजात आर्थिक स्थित्यंतरे दिसून येत आहेत. परंतु भारतीय माणसाचे जातीवरचे प्रेम इतके मोठे आहे, की जग बुडाले तरी चालेल पण जात सोडायची नाही. तशीच परिस्थिती साहित्यातही आहे. दलितांच्या अथवा मागास समाजाविषयीची स्थित्यंतरे कुणी मांडायची तर ती दलित लेखकानेच मांडावी. परंतु आधुनिक काळात ग्लोबलायझेशननंतर आलेली विविध स्तरांवरील स्थित्यंतरे पाहता जागतिकीकरणानंतरचे समाजाचे प्रतिबिंब साहित्यात दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. साहित्य ही काही खेळाची रनिंग कॉमेंट्री नव्हे तर वास्तव मांडणारे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने बुधवारपासून दोनदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. "सामाजिक स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य' या विषयावरील चर्चासत्राचे उद््घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. समीक्षक प्रा. दिगंबर पाध्ये, विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे, समन्वयक डॉ. रमेश जाधव, प्रा.डॉ.अशोक देशमाने, डॉ. मीरा घाडगे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डाॅ. दासू वैद्य यांची उपस्थिती होती.
राजकारणापासूनच स्थित्यंतर
डाॅ. कोत्तापल्ले म्हणाले, हा विषय एका शाखेपुरता मर्यादित नाही. याचा विविध ज्ञानशाखांशी संबंध आहे. स्थित्यंतराची सुरुवात ही खरे तर राजकारणापासून होते. जी सध्या आपच्या रूपाने दिल्लीतही पाहावयास मिळते. तशीच स्थिती साहित्यात आहे. राजकीय, आधुनिक आणि जागतिक अशा तीन विभागांत ही स्थित्यंतरे पाहता येतील. सुरुवातीच्या काळात भारतात सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. इंग्रज, मुस्लिम आणि त्यानंतर राजकीय सत्तांतराबरोबरच आता सांस्कृतिक बदलांचाही प्रारंभ होताना दिसत आहे. त्यामुळे धर्माचाही पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. हे स्थित्यंतर चिंताजनक असून माणूस हा माणूसच राहिला पाहिजे. माणसाचे प्रश्न धर्माच्या आधारावर सोडवता येणार नाहीत, असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.

जात राजकारणासाठी -
स्थित्यंतरात महत्त्वाचा भाग बनली ती भांडवलशाही आणि जात. जात पूर्वी आणि आजही राजकारणासाठीच वापरली जात असल्याने जातीयवाद कायम आहे. सामाजिक चळवळीतही स्थित्यंतरे आली आहेत. बहुसंख्याकांना सामावून घेणे असा व्यापक दृष्टिकोन या स्थित्यंतरात होता. स्वातंत्र्य हे राजकीय परिवर्तन होते. परंतु आज आर्थिक आणि जागतिकीकरणात आलेल्या स्थित्यंतरामुळे कल्याणकारी राज्य असा उल्लेख कुणीही करत नाही. समाजाची सत्ता ही भांडवलदारांच्या हाती गेली आहे, असेही डाॅ.कोत्तापल्ले यांनी या वेळी सांगितले.

घरवापसी हा शुद्ध वेडेपणा
आधुनिक काळात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साथीने प्रगती साधायची सोडून आजही जातीत अडकलेल्या भारतीय समाजव्यवस्थेत घरवापसीसारखे प्रकार होत आहेत. हा शुद्ध वेडेपणा असल्याचे डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले. आज जी सामाजिक स्थित्यंतरे काळानुरूप क्षणाक्षणात बदलत आहेत, त्यातून तरी राजकीय पटलावर समजूतदारपणा यायला हवा. अन्यथा जी स्थित्यंतरे आपच्या रूपाने दिल्लीच्या राजकारणात दिसून येत आहेत, तीच स्थिती इतर ठिकाणी यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भालचंद्र नेमाडेंशी वाद कायम असल्याची स्पष्टोक्ती
डाॅ. भालचंद्र नेमाडे यांचे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. परंतु त्यांच्याशी असलेला वाद कायम असल्याचे डॉ. कोत्तापल्ले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ज्या जातीचे नेमाडे समर्थन करतात तो देशीवाद न पटणारा आहे. आधुनिक फायदे घेऊन मग मध्ययुगीन गप्पा मारणे हे न पटणारे आहे. त्यामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असला तरी ते फार मोठे झालेत असे नाही.