आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजाबाग एन्काऊंटरमधील दोन आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी, बॉम्बस्फोटातही सहभाग : कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रोजाबाग येथे 2012 साली एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करुन हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ (32, रा. चंदननगर, इंदूर, मध्य प्रदेश) व आरोपी मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील अखिल खिलजी (20, रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ठोठावली तर इतर दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी मुक्त केले.

निकाल देताना, आरोपींनी बाँबस्फोट घडवून आणले असून, देशविघातक कारवायांमध्ये आरोपींचा समावेश असल्याचे मतही कोर्टाने नोंदविले आहे. या प्रकरणी 11 सप्टेंबर 2017 रोजी कोर्टात सुनावणी सुरू झाली व 27 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली; म्हणजेच अवघ्या 16 दिवसांत सुनावणी पूर्ण झाली आणि सहाव्या दिवशी कोर्टाने शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात पकडलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न केल्याचा’ गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार आरोपींना सुनावणीसाठी वेगवेगळ्या कारागृहातून औरंगाबादच्या जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यापैकी काहींचे ‘इन कॅमेरा’ जबाबही नोंदविण्यात आले होते.
 

26 मार्च 2012 रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र आरोपींना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. या वेळी आरोपींनी एटीएस पथकावर गोळया झाडण्यास सुरुवात केली होती. यात पोलिस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला होता, तर दहशवादी मोहम्मद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. या प्रसंगी पाठलाग करून एटीएसने आरोपी अबरार यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्य प्रदेश) याला अटक केली होती. आरोपींकडून 4 गावठी कट्टे, 2 रिव्हॉल्व्हर, 17 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
 
सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी 23 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये तत्कालिन पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, तत्कालिन एटीएस प्रमुख नवीनचंद्र रेड्डी, तत्कालिन हवालदार शेख आरेफ, डॉ. कैलास झिने, डॉ. पांचाळ, तत्कालिन पोलिस आयुक्त संजय कुमार आदींची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन आरोपी मोहम्मद अबरार व आरोपी मोहम्मद शाखेर यांना कोर्टाने कलम 370 अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजुरी, तर ‘आर्म्स अक्ट’अन्वये 2 आरोपींना 3 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी ठोठावली. तर, सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आरोपी जफर हुसेन इक्बाल हुसेन कुरेशी (33, रा. खंडवा, मध्य प्रदेश) व आरोपी अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (40, रा. इंदूर) यांना मुक्त केले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...