आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Groups Fighting Each Other In Aurangabad City

औरंगाबाद शहरात दोन गटांत तुंबळ हाणामारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (13 एप्रिल) क्रांती चौकात व्यासपीठ उभारण्यावरून भीमशक्तीचे अरुण बोर्डे आणि पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे युवा उपाध्यक्ष पंकज बोर्डे या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार दुपारी तीन वाजता घडला. हाणामारीत दोन्ही गटांतील अकरा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. कडेकोट पोलिस बंदोबस्तात कार्यकर्त्यांनी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन्ही व्यासपीठे हटवली. मागील दोन दिवसांपासून क्रांती चौकात व्यासपीठ उभारण्यावरून भीमशक्ती आणि पँथर्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी रात्री दोन्ही गटांत किरकोळ वाद झाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शांततेत जयंती साजरी करा, अन्यथा ठोस पावले उचलावी लागतील, असा सज्जड दम भरला होता. त्यानंतर शुक्रवारी पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर गाडे आणि भीमशक्तीचे अरुण बोर्डे यांना पोलिस आयुक्तालयात बोलावून घेतले होते. या वेळी त्यांना व्यासपीठांचा वाद आपसात मिटवावा, अशी सूचना केली होती. मात्र, तरीही शनिवारी या वादाला तोंड फुटले. भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी व्यासपीठ उभारले. यानंतर त्यांच्याच शेजारी पँथर रिपब्लिकनचे बोर्डेही कार्यकर्त्यांसह व्यासपीठ उभारण्यासाठी आले. जागेवरून वाद होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. व्यासपीठ उभारण्यासाठी आणलेल्या लाकडी दांड्यांनी भीमसैनिकांनी एकामेकांची डोकी फोडली. या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. जमाव पांगवत पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलवले. यामध्ये अरुण बोर्डे यांच्यासह गटातील योगेश विठ्ठल बोर्डे (20), मनोज दीनानाथ वाहूळ (22), रतन पुंडलिक कारले (25), रणजित श्यामराव दाभाडे (27), मनोज रमेश त्रिभुवन (25), तुषार अशोक बोर्डे (21) आणि निखिल नितनवरे (20) असे आठ जण जखमी झाले. बोर्डे यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर कार्यकर्ते घाटीत उपचार घेत आहेत. गाडे गटातील जॅकी ऊर्फ विकी रणधीर राणा (27), मिल्लू ऊर्फ निल्लो कैलास चावरिया (25, दोघेही रा. गांधीनगर) आणि पंकज सर्जेराव बोर्डे (29, रा. मिलिंदनगर) हे जखमी झाले. जॅकी राणा हा गंभीर जखमी असून गाडे गटाच्या या तिघांना घाटीत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळी क्रांती चौक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अतिक्रमण हटाव पथकाला या वेळी पाचारण केले होते, परंतु भीमसैनिकांनी स्वत: दोन्ही व्यासपीठे हटवली. रात्री उशिरापर्यंत जखमींचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. पोलिसच यामध्ये फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मेघराजानी यांनी दिली.
हाणामारी झाल्यानंतर क्रांती चौकात स्टेज काढण्यात आले. या वेळी पोलिसांचा फौजफाटा होता.


व्यासपीठावरून कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाल्याचे माझ्या कानी आले आहे. अशा प्रकारची किरकोळ भांडणे होतातच. गंगाधर गाडे, अध्यक्ष, पँथर रिपब्लिकन.


व्यासपीठ उभारण्यावरून कुठलाही वाद झाला नाही. कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला. अरुण बोर्डे, भीमशक्ती