आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय टोळीतील 2 दरोडेखोरांना अटक; शहरात मोठे दरोडे, चोऱ्या केल्याचा पोलिसांचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातदबा धरून बसलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील दोन दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी रात्री एकच्या सुमारास अभिनय टॉकीज परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, चाकू, कापड, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्यांना क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

आरोपी समीरसाह मुस्तफा देवाण (२८) आणि मिटुकुमार देविकांत ठाकूर (२२, दोघेही रा. मोतीहारी, बिहार) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांच्यासमोर हजर केले असता त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काही व्यक्ती अभिनय टॉकीजच्या मागे दबा धरून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. मात्र, अंधाराचा फायदा घेत या टोळीतील पाच सदस्य पळाले. या टोळीने नेपाळमध्येही चोरी केल्याचे समोर आले आहे. शहरात या टोळीने मोठे दरोडे अाणि चोऱ्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे आरोपी शहरात होते, असेही तपासात पुढे आले आहे. 

अटकेतील दरोडेखोरांनी सांगितल्यानुसार रहमान कलम आलम, कदीर आलम, सलमान कुरेशी, संतोषकुमार कुशवाह, मुमताज आलम अशी पळालेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सहायक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी आरोपी बिहार राज्यातील असून त्यांनी गावठी पिस्तूल कशासाठी आणले होते, त्यांनी यापूर्वी गुन्हे केले आहेत काय, त्यांचा उद्देश काय होता याबाबत माहिती घेण्यासाठी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
बातम्या आणखी आहेत...