औंरंगाबाद: केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला रविवारी दोन महिने पूर्ण झाले. पहिले पन्नास दिवस शहरातील बँकांत भेडसावणारी चलन टंचाई आता दूर झाली आहे. त्यामुळे सर्वच खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये २४ हजार रुपयांचे वितरण केले जात आहे. एटीएमवरही साडेचार हजार रुपये सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बँका आणि एटीएम या दोन्हीवरची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.
नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतर जानेवारी महिन्यातील पगारही सुरळीत पार पडले. यापूर्वी डिसेंबरमध्ये पगारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र जानेवारीचा पहिला आठवडा संपला तरी बँकांना पगार करण्यात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच २०० कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागात रक्कम पुरवण्याचे बँकांना आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामीण भागातही चलन पुरवठा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक जी.एस.वाकडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात रकमेचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. यापूर्वी ग्रामीण भागात चलन तुटवडा होता. मात्र आता चित्र बदलले आहे. आरबीआयकडून पतपुरवठा करण्यात आल्यामुळे वितरणात कोणतीही अडचण नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औरंगाबाद शहरात ०६ आणि जिल्ह्यात ४२ शाखा आहेत. सर्वत्र २४ हजारांचे वितरण सुरळीत करण्यात येत आहे.
डिपॉझिटचे प्रमाण वाढले : नोटाबंदीनंतरबँकांतील डिपॉझिटचे प्रमाण थंडावले होते. मात्र आता पैसे जमा करण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे बँकेच्या शाखेत साधारण दहा लाख रुपये रोज जमा होत आहेत. त्यातच ज्या बँकेत पेट्रोलपंप धारकांचे खाते आहे त्यांचेही रोज चार ते पाच लाख रुपये जमा होत आहेत. त्यामुळे वितरणात अडचणी येत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
गर्दी कमी वितरण सुरळीत
- बँकांमधील गर्दीआता कमी झाली आहे. २४ हजारांचे वितरणही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे एटीएम आणि बँका दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळत नाही. तसेच बँकांमध्ये डिपॉझिटचे प्रमाणही वाढले असल्याने वितरण सुरळीत करण्यास फायदा होत आहे.
रमेशभालेराव, व्यवस्थापक एस.बी.एच
ग्रामीण भागात रक्कम उपलब्ध
- ग्रामीण भागात नोटांचे वितरण सुरळीत होत आहे. बँकांना आरबीआयकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व ४२ शाखांत २४ हजारांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चलन टंचाई देखील कमी होत आहे.
जी.जी.वाकडे, सरव्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक
एटीएमवरही मिळताहेत पैसे
औरंगाबाद शहरात बँका आणि एटीएम दोन्ही ठिकाणी नोटाबंदीनंतर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र आता बँकेतही गर्दी नाही. तसेच एटीएमवरही पैसे उपलब्ध असल्यामुळे तेथील रांगा कमी झाल्या आहेत. सध्या एटीएममध्ये साडेचार हजार रुपये मिळत असल्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.