आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पिस्तुले, 24 काडतुसे सापडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पतंग पकडण्यासाठी शनिवारी सकाळी 9.30 वाजता फाजलपुर्‍यातील मुर्गी नाल्यात उतरलेल्या शाळकरी मुलाला सुटकेसमधील दोन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दोन पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसे सापडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र, ही पिस्तुले कोणाची आहेत हे समजू शकले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून चेलीपुर्‍याकडे जाणार्‍या रस्त्यावरील नाल्यात गणेश राजू वाघमारे (12) पतंग पकडण्यासाठी गेला. पतंगाचा धागा पकडताना त्याला नाल्यातील कोरड्या जागेत काळ्या रंगाची सुटकेस दिसली. उत्सुकतेपोटी त्याने ही सुटकेस उघडली. तेव्हा त्यातील फिजिओलॉजीच्या सहाव्या आवृत्तीच्या सुमारे चारशे पानी पुस्तकात आणि अन्य एका पुस्तकात पिस्तुलाच्या आकारात पाने कापून त्यात दोन्ही पिस्तुले बसवण्यात आली होती. तसेच पांढर्‍या रुमालात जिवंत काडतुसे आढळली. गणेशने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा शहर संघटक संदीप चांदणे यांनी सकाळी 10 च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. त्यानंतर सिटी चौक पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व पिस्तूल, काडतुसांची सुटकेस ताब्यात घेतली. आर्म अँक्टनुसार सिटी चौक ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त डॉ. जय जाधव, एटीएसचे अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी आणि पोलिस निरीक्षक विजय सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संजयकुमार यांनी गणेश वाघमारे या मुलाला एक हजार रुपयांचे बक्षीस दिले.
पुस्तक सांगेल आरोपी कोण?: यातील एका पुस्तकाची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे. या पुस्तकावरून कदाचित ही पिस्तुले कोणाची, त्याने नाल्यात कशासाठी ठेवली, पुस्तकात पिस्तुले ठेवण्यामागचा त्याचा हेतू काय होता यासह अन्य प्रश्नांची उत्तरे मिळतील. पिस्तुलांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि बॉम्बनाशक व शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते.