आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Railway Announced To Aurangabad, Provision In Railway Budget

औरंगाबादकरांच्या सेवेत दोन रेल्वेगाड्या, रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रेल्वेच्या अंतरिम बजेटमध्ये औरंगाबादकरांसाठी दोन रेल्वेगाड्या मिळाल्या असून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता परभणी, बिदर, विकाराबादमार्गे औरंगाबाद-रेणीगुंटा एक्स्प्रेस आणि नांदेड-औरंगाबादसाठी आठवडी रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे.


केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये मागील वर्षी शहरासाठी तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी कुर्ला -अजनी, कुर्ला-निजामाबाद या दोन रेल्वेगाड्या सुरू केल्या. चेन्नई-नगरसोल रेल्वे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. शहरातून अनेक रेल्वेगाड्यांची मागणी होत असताना केवळ दोन गाड्यांवर समाधान मानावे लागत आहे. दोन गाड्यांमुळे शहरातून येणार्‍या व जाणार्‍या गाड्यांची संख्या 50 वर गेली आहे. अंतरिम रेल्वे बजेटमध्ये परळी-परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे.


शहरासह सबंध मराठवाड्यातून तिरुपतीसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केलेल्या साप्ताहिक औरंगाबाद-रेणीगुंटा रेल्वेस सप्टेंबरपासून मुदतवाढ देणे सुरू होते. अखेर औरंगाबाद-रेणीगुंटा या साप्ताहिक रेल्वेची घोषणा करण्यात आली. नांदेड व औरंगाबाददरम्यान धावणार्‍या नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस व नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस धावणार आहे.


मराठवाड्यावर अन्याय
रेल्वेने मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी रेल्वेचे ट्रॅक 22 वर्षांत बदलले नसल्याचे सांगून, रेशनिंग पॉइंट पॉलिसी बदलण्यात यावी, अशी मागणी केली. रोटेगाव-पुणतांबा या प्रलंबित मार्गासंबंधी तरतूद आवश्यक असल्याचे मध्य रेल्वे विभागीय उपभोक्ता समितीचे सदस्य अजमल खान यांनी म्हटले आहे. नांदेड- बिकानेर गाडीची घोषणा बजेटमध्ये अपेक्षित होती, असे राजकुमार सोमाणी म्हणाले. औरंगाबादेतून धावणार्‍या रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा रेल्वे विकास समितीचे संस्थापक ओमप्रकाश वर्मा यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या तोंडावर केवळ पाने पुसल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.


ती गाडी कधी धावणार ?
मागील वर्षी घोषणा केलेल्या तीनपैकी एक गाडी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. मराठवाड्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. आदर्श रेल्वेस्टेशनसाठीही तरतूद नाही.