आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना दिल्लीतून अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील उच्चशिक्षित महिलेला १५ लाखांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना क्रांती चौक सायबर शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. उजेह ऑगस्टिन उगो चिकवू (२५) आणि चुक्वई जॉर्ज (२५)अशी अटकेतील भामट्यांची नावे आहेत.

शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या मोनाली (बदललेले नाव) या ५० वर्षीय उच्चशिक्षित महिलेची फेसबुकच्या माध्यमातून जेम्स ड्यूक आणि गिल पीटरसन या दोघांशी ओळख झाली. मोनाली यांनी फेसबुकवर आपला मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर जेम्स आणि गिल यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून मैत्री वाढवली. त्यांनी मोनाली यांना मेजर मरिन टूर्स वर्ल्ड क्लास वाइल्डलाइफ अँड ग्लेशियर क्रुझेस या कंपनीचे कार्यालय लवकर नवी दिल्लीत सुरू होत असल्याची थाप मारून या कंपनीसाठी अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या महिलेची गरज आहे, तुम्ही इच्छुक असाल तर या कार्यालयाचे प्रमुख केले जाईल, असे आमिष दाखवले.

असा घातला गंडा : १५ एप्रिल दरम्यान भामट्यांनी मोनाली यांना फोन करून दिल्लीतील कार्यालयासाठी ॲपल कंपनीची काही उत्पादने, सोनसाखळीसह अडीच लाख अमेरिकन डॉलरची रक्कम एअरपोर्टवर पाठवली होती. मात्र, ती पकडली आहे. अशा वस्तू अमेरिकन डॉलर पाठवण्यास परवानगी नसल्याने तुमच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आमच्या एका व्यक्तीला अटक झाली असून तुम्हालाही अटक होऊ शकते, असे सांगून त्यांनी मोनाली यांना आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्यास सांगितले. या प्रकाराने घाबरलेल्या मोनाली यांनी स्वत:कडील काही रक्कम आणि नातलगांकडून उसने घेऊन १५ लाख रुपये तातडीने बँक खात्यावर जमा केले.

पोलिस आयुक्तांची भेट : याच दरम्यान गिल पीटरसन आणि सुनीता शर्मा नावाच्या महिलेनेही मोनाली यांना फोन करून दिल्लीला कुरियर पोहोचते करण्यासाठी त्याचा खर्च करावा लागेल, असे म्हणत पुन्हा पैशाची मागणी केली. सतत पैशाची मागणी अटकेची भीती दाखवली जात असल्याने या टोळीचा कसा बंदोबस्त करावा हे मोनाली यांना समजेना. पोलिसांत गेल्यास आपल्यावरच गुन्हा दाखल होईल, अशी भीतीही वाटत होती. मात्र, १७ जून रोजी त्यांनी हिंमत करून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला.

यांनी केली बेधडक कामगिरी : ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, पोलिस उपनिरीक्षक नितीन आंधळे, हेमंत तोडकर, अनिल वाघ, अनिल कुरुंदकर, सायबर सेलचे पोहेकॉ. राजपूत, पोलिस नाईक खरे, कॉन्स्टेबल गवळे, नितीन देशमुख, कुलकर्णी, सानप, तुपे, शेळके, कुटे, एखंडे, साकला, खरात, दाभाडे, चव्हाण, सोनवणे, जांभोटकर, भोरे यांनी केली. या पथकाला ५० हजारांचे बक्षीस पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. या गुन्ह्याचा तपास क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे करीत आहेत.
दहादिवस चालले ऑपरेशन : औरंगाबादचेपथक दहा दिवस दिल्लीत होते. मोबाइल लोकेशन फेसबुकवरील फोटो एवढाच पुरावा होता. मात्र कुरुंदकर, कुलकर्णी, वाघ, देशमुख, गवळे यांनी चलाखीने या भामट्यांना अटक केली. मेहोरुलीत मोठ्या संख्येने नायजेरियन राहतात. पाच कर्मचाऱ्यांवर हे मिशन फत्ते करणे जोखमीचे होते. त्यामुळे अमितेशकुमार यांनी दिल्लीचे सहायक आयुक्त रवींद्रकुमार यादव यांना कारवाईची कल्पना दिली. दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानेच भामट्यांची ओळख पटली. हॉटेलमध्ये पार्टी सुरू असताना पोलिसांनी भामट्यांना उचलले. या दोघांशी झालेल्या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, भामट्यांचे आयसीआयसीआय बँकेतील खातेही गोठवण्यात आले आहे.

भामट्यांना पार्टीतून उचलले
मोनालीयांच्यावर बेतलेला प्रकार गंभीर असल्याने आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास सायबर क्राइमकडे सोपवला. दिल्लीच्या मेहोरुली भागात या नायजेरियन भामट्यांचे वास्तव्य असल्याचे तपासात समोर आले. आयुक्तांनी गुन्हे शाखा सायबर क्राइमचे पथक दिल्लीला रवाना केले. तेथे एका हॉटेलात पार्टीत रमलेल्या उजेह ऑगस्टिन चुक्वई यांना ताब्यात घेतले.

सायबर शाखेचे गजानन कल्याणकर, अनिल वाघ, नितीन देशमुख, रेवण गवळे, नितीन अांधळे यांच्या पथकाचा सत्कार करताना अायुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप अाटाेळे, सहायक अायुक्त खुशालचंद बाहेती. छाया : रवी खंडाळकर
बातम्या आणखी आहेत...