आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शाळकरी मुलींचा विहिरीत पडून मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील सारोळ्यातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- तालुक्यातील सारोळा येथील दोन शाळकरी मुलींचे मृतदेह गुरुवारी संशयास्पदरीत्या विहिरीत आढळून आले. शिवानी रामदास पार्वे (7) व राधा राजू शिंदे (9) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. भंडारा येथे तीन मुलींचे मृतदेह अशाच रीतीने आढळून आले होते. त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. त्याच वेळी ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

शिवानी व राधा या खेळण्यासाठी म्हणून बुधवारी घराबाहेर पडल्या. बरीच शोधाशोध केल्यानंतर गुरुवारी सकाळी काशीनाथ भिकन वराडे यांच्या शेतातील विहिरीत मुलींच्या चपला तरंगताना दिसल्या. दुपारी महसूल कर्मचारी व 100 पोलिसांच्या बंदोबस्तात मृतदेह काढण्यात आले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्राथमिक अहवालात विहिरीत पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. तथापि, व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे.

राधा मामाकडे राहत होती : जिल्हा परिषद शाळेत तिसरीत असलेल्या राधाला वडील नाहीत. मामा विष्णू साळवे यांच्याकडे ती राहत होती. भोळसर असल्याने ती नियमित शाळेत जात नव्हती. तर शिवानीचे वडील रामदास पार्वे हे शेतकरी आहेत. त्यांना पाच एकर शेती आहे. गावातील एकात्मिक बालविकासच्या बालवाडीत शिकणार्‍या शिवानीला एक भाऊही आहे. दरम्यान, नातलगांच्या मनात शंका राहू नये यासाठी त्यांच्यासमक्ष घटनेचा पंचनामा केला, असे सहायक पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.


ढकलून दिले असावे- शिवानी एवढय़ा दूर चालू शकत नव्हती. तिच्या डोक्याला दगडांचा मार लागलेला आहे. त्यामुळे तिला विहिरीत ढकलले असावे किंवा मृत्यूनंतर विहिरीत टाकले असावे.'' - रामदास पार्वे, शिवानीचे वडील.

घातपाताचा संशय- मुलींचा मृत्यू हा घातपात असावा.विहीर घरापासून दीड कि.मी. दूर आहे. मुली एवढे अंतर चालून जाऊ शकत नव्हत्या.'' - विष्णू साळवे, राधाचे मामा