आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Thousand Billon Rupee Energy Crises On Rupublic India, Warning Dr.kakodkar

प्रजासत्ताक भारतावर दोनशे हजार अब्ज रुपयांचे ऊर्जा संकट,डॉ. अनिल काकोडकर यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रजासत्ताक भारत आर्थिक प्रगतीच्या रथावर स्वार आहे. मात्र, हा रथ ओढण्यासाठी पुढील 20 वर्षांत दोनशे हजार अब्ज रुपये मोजावे लागतील याची जाणीव फारशी कोणाला नाही. आज आपण 30 टक्के ऊर्जा आयात करतो. 2032 मध्ये 60 टक्के ऊर्जा आयात करावी लागेल. त्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील. म्हणूनच थोरियमपासून मिळणारी अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा अशा पर्यायांचा गंभीरपणे विचार करावाच लागेल. अन्यथा आर्थिक वाटचाल खडतर होईल, असा इशारा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाभा अणुसंशोधन संस्थेचे सध्याचे चेअर प्रोफेसर डॉ.अनिल काकोडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिला.
ऊर्जा संकटाची अधिक माहिती देताना डॉ. काकोडकर म्हणाले, आज आपण वापरत असलेली ऊर्जा दीर्घकाळ टिकणारी नाही. भारत महासत्ता होणार असल्याचे आपण बोलतो, पण अर्थकारणाचा थेट संबंध ऊर्जा निर्मितीशी आहे हे लक्षात येत नाही. आपली अर्थव्यवस्था जर 8 टक्के वार्षिक दराने वाढत असेल तर त्याच दराने ऊर्जा निर्मितीही वाढली पाहिजे. ऊर्जा वाढली नाही तर अर्थकारणाला गती कशी येणार.
आता आठ टक्के विकास दर गृहीत धरला तर सात आठ वर्षात ऊर्जेची मागणी दुप्पट होईल आणि वीस वर्षांत 16 पट वाढेल. भारताची मागणी वाढली तरी आपण ऊर्जा विकत घेऊ शकणार नाही, कारण जगात ऊर्जेची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
अमेरिकेबरोबर झालेल्या अणुकराराच्या प्रभावी अंमलबजावणीतील अडचणी, देशातील राजकीय इच्छाशक्ती, इंधनावरील सबसिडी, अणुऊर्जेचा वापर, अणुऊर्जा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक, अशा मुद्द्यांबरोबरच ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी आवश्यक अशी पंचसूत्रीही त्यांनी विशद केली.
संकट तोंडावर, आपण बेसावध
जगभरातील तेलाच्या किमती आणखी 20 वर्षात आटोक्याबाहेर जातील. मागणी वाढेल, पुरवठा घटेल. यामुळे ऊर्जेचा प्रश्न आणखी बिकट होईल. आज लोकांना ऊर्जेच्या गरजेची थोडीफार जाणीव असली तरी भविष्यातील भीषण संकटाची त्यांना कल्पना नाही. ऊर्जाटंचाईचे भीषण संकट उंबरठ्यावर आले आहे व त्याला तोंड देण्यासाठी आपण पुरेसे तत्पर नाही. ही गंभीर बाब आहे.
अणुऊर्जेची अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे
हे संकट टाळण्यासाठी अणुऊर्जा हाच पर्याय आहे. प्रगतीसाठी ऊर्जा हवी ही लोकांची श्रद्धा आहे, त्याच वेळी दुर्दैवाने अणुऊर्जेबद्दल अंधश्रद्धा बोकाळली आहे. या अंधश्रद्धेचा शेवट करण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे.