आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरात कारसह दुचाकी जाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गेल्या चार वर्षांपासून बजाजनगर परिसरातील शेकडो वाहने भस्मसात करून पोलिस प्रशासनाला आव्हान बनलेल्या माथेफिरूने पुन्हा एकाच रात्रीतून कारसह दुचाकी जाळल्याची घटना बजाजनगरातील दोन वेगवेगळ्या भागांत गुरुवारी पहाटे उघडकीस आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. १८ मार्च २०१५ रोजी वाहन जाळणार्‍या माथेफिरूच्या दिशेने केलेल्या फायरिंगमुळे यापुढे वाहन जाळण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास बाळगणार्‍या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे सावट दिसून येत आहे.

गुरुवारी १२.४० वाजेच्या सुमरास स्वेद शिल्प हाउसिंग सोसायटी आरएक्स १६/४ येथे राहणारे बजाज कंपनीतील कामगार अनिल हंबीरराव देसाई यांची फोर्ड फिगो कंपनीची कार (एमएच २० सीएस ८७९२) ही रात्री झोपण्यापूर्वी अंगणात भिंतीलगत उभी केली होती. ती माथेफिरूने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. त्यात कारची समोरील बाजू जळाली. सुदैवाने घराच्या दुसर्‍या मजल्यावर राहणारे त्यांचे भाडेकरू बालाजी ढास यांना कार जळत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी इतरांच्या मदतीने पाणी टाकून तत्काळ आग विझवली. त्यानंतर बालाजी यांनी १०० नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक घटनास्थळी धावले. तसेच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीदेखील सकाळी फौजफाट्यासह देसाई यांच्या घरी जाऊन पाहणी केली.

२० दिवसांपूर्वीच घेतली दुचाकी
त्रिमूर्तीचौकालगतच्या कृष्णकमल हाउसिंग सोसायटीत राहणार्‍या प्रशांत जगन्नाथ चिखले यांची २० दिवसांपूर्वीच खरेदी केलेली विनाक्रमांकाची डिस्कव्हर दुचाकी जिन्याखाली उभी होती. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास माथेफिरूने ही दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णत: भस्मसात केली. माथेफिरूने घराच्या खिडकीतून सॅमसंग कंपनीचा मोबाइलही चोरल्याची तक्रार चिखले यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.