औरंगाबाद- दोनपत्नींच्या भांडणात नवऱ्याने स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (२५) दुपारी तीनच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सय्यद सिकंदर सय्यद हिलादी (३०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चिकलठाणा परिसरातील हिनानगरातील सय्यद सिकंदर सय्यद हिलादी यांचे दोन विवाह झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या विवाहातील पहिली पत्नी सायरा आणि तीन ते चार वर्षांपूर्वी त्याचा दुसरा विवाह शबनम सोबत झाला. बुधवारी दुपारी त्याचे दोन्ही पत्नींसोबत कडाक्याचे भांडण झाले. या वेळी त्याने रागाच्या भरात स्वत:च छातीवर आणि हातावर ब्लेडने सपासप वार केले. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. ही माहिती त्याच्या पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सय्यदला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.