आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूच्या डंपरने दोन तरुणांना चिरडले, हद्दीच्या वादावरून सव्वा तास मृतदेह घटनास्थळीच पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - शहर परिसरात धावणारे वाळू खडीचे ट्रक नागरिकांच्या मुळावर उठले आहेत. गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास वाळूच्या ट्रकने दुचाकीवरील दोन तरुण कामगारांना चिरडले. दोघांचाही जागीच अंत झाला. ही घटना थम्सअप कंपनीसमोर घडली. घटनेनंतर पाऊण तासाने पोहोचलेल्या वाळूज ठाण्यातील पोलिसांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित करून मृतदेह हलवण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल सव्वा तास मृतदेह घटनास्थळीच पडून होते. त्यामुळे शोकसंतप्त नातलगांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाळूजला धाव घेत या नातलगांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. तसेच डंपर मालक चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर वातावरण निवळले.
गंगापूर तालुक्यातील कनकोरी गावातील बाळू रुस्तूम पवार (२८), सोमीनाथ भाऊसाहेब पवार (२५) हे दोघे चार वर्षांपासून गरवारे कंपनीत कंत्राटी कामगार होते. रात्रपाळी आटोपून बाळू आणि सोमीनाथ गुरुवारी सकाळी वाजता कंपनीतून दुचाकीवर (एमएच २० एव्ही २१७०) बाहेर पडले. बाळू दुचाकी चालवत होता. त्यांची दुचाकी थम्सअप कंपनी चौकात येताच गंगापूरकडून वाळू भरलेल्या हायवा ट्रकने (एमएच एक्यू ३९३) टीसीआय गोदामाकडे वळण घेताना दुचाकीला ठोकरले. दोघेही खाली पडले. मात्र, ट्रक थांबला नसल्यामुळे दोघेही मागच्या चाकाखाली सापडून चिरडले गेले. अपघातानंतर चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झाला.

हद्दीच्या वादात मृतदेहाची अवहेलना
नगर-औरंगाबाद महामार्गावर वाळूज ते गोलवाडी फाट्यापर्यंतचा भाग वाळूज, वाळूज एमआयडीसी सातारा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात येतो. गरवारे कंपनीलगतच्या साई पेट्राेल पंपापर्यंत वाळूज पोलिस ठाण्याची हद्द आहे. तेथून पुढे एमआयडीसी पोलिस ठाण्याची हद्द सुरू होते. ही घटना वाळूज पोलिस ठाणे हद्दीत घडली होती. पिकअप व्हॅनसह (एमएच २० सीयू १६) वाळूज ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांनी पाेलिस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित करून मृतदेह घाटीत हलवण्यास नकार दिला. त्यामुळे नारायणपूरचे कय्यूम पठाण बकवालनगरातील काकासाहेब केरे यांनी अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला काढून मृतदेहांवर कपडा टाकला.

सिग्नल बसवण्याचा प्रयत्न
वाळूज येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून त्यात बदल करण्याची गरज आहे. चौकांत सिग्नलची गरज आहे. मोठ्या कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा करून त्यांना सिग्नल बसवण्याची विनंती केली जाईल. तसेच सर्वच दुभाजकाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी संबंधित विभागाला कळवण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
संतप्त नातलगांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली.

नातलगांनी महामार्ग रोखला
पोलिसांनी मृतदेह घाटीत हलवण्याऐवजी हद्दीचा प्रश्न उपस्थित केल्याने संतप्त नातलगांनी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच महामार्ग रोखला. पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, उपनिरीक्षक विठ्ठल सोनटक्के यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दहा वाजेपर्यंत रास्ता रोको सुरू होता. तोपर्यंत मृतदेह घटनास्थळी पडून होते.
पुढील स्लाईवर वाचा.. आयुक्त नातलगांना भेटले...
बातम्या आणखी आहेत...