आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Along With Union Minister Attended Khaire\'s Daughter Wedding

खासदार खैरे यांच्या कन्येचा शाही थाटात विवाह सोहळा, ठाकरेंसह केंद्रीय मंत्र्यांची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा सोमवारी (चार जानेवारी) पार पडला. मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट कोसळले असताना एखाद्या राजघराण्यातील सोहळ्यासारखी उधळपट्टी या निमित्ताने झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गिते, नितीन गडकरी आदींसह अनेक उद्योजक, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

जयपूर पॅलेसच्या धर्तीवर मंच सजवण्यात आला होता. तेथे हायड्रोलिक मंचावरून वधूवरांची एंट्री झाली. फुलांची प्रचंड उधळण करीत हा शाही विवाह पार पडला. या वेळी शेकडाे लोकांनी वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केल्याने सुरक्षेचा पूर्ण बोजवारा उडाला होता. ठाकरे यांचे आगमन झाले त्या वेळी मंच कोसळेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वधूवरांना भेटून ठाकरे तातडीने तेथून बाहेर पडले. या सोहळ्यातील भोजन व्यवस्थेत व्हीआयपी, मिनी व्हीआयपी आणि आम जनता अशी विभागणी केल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळाची स्थिती असताना एवढा खर्च करायला नको होता, अशी भावना सेनेच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी खासगीत व्यक्त केली. खैरे यांनी वेळोवेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत केली. तरीही त्यांनी एवढा खर्च का केला, असा सवाल ही मंडळी करत होती.

शहरातील शिवसेेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर नियोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. माजी आमदार प्रदीप जैस्वाल, खैरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक नंदकुमार घोडेले, माजी शहरप्रमुख बंडू ओक यांच्याकडे मंचावर गर्दी होऊ नये, हे काम सोपवण्यात आले होते. मात्र, पाहुण्यांची प्रचंड गर्दी उलटल्याने तेही हतबल झाले होते. भोजनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणीही मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या मान्यवरांची उपस्थिती
यालग्न सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, संजय जाधव, आनंदराव अडसूळ, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बाला, शिवाजीराव अाढळ पाटील, प्रतापराव जाधव, अनिल देसाई, आ. संदीपान भुमरे, सतीश चव्हाण, नारायण कुचे, अतुल सावे, इम्तियाज जलील, विक्रम काळे, हेमंत पाटील, माजी आ. राजेंद्र दर्डा यांनी हजेरी लावली.
पुढे पाहा, खासदार खैरे यांनी कन्येच्या विवाहा सोहळ्यासाठी व्हिडिओच्या माध्‍यमातून आमंत्रण दिले आणि खासदारांच्या कन्येच्या विवाहाची काही छायाचित्रे...
(टीप : सर्व छायाचित्रे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या फेसबुक पानावरुन घेतली आहेत.)